अनेकांचे जीव वाचविणाऱ्या ॲम्ब्ल्युलन्सवरील देवदूताला मिळेना रेमडेसिविर औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 01:53 PM2021-04-22T13:53:51+5:302021-04-22T13:53:58+5:30
अनेकांना वाचवले; स्वत:वर ओढावला दुर्धर प्रसंग
कुर्डूवाडी : कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना वेळेत उपचारासाठी ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पोहोचवण्याची सेवा बजावणारा देवदूताला कोरानाने गाठले. तो सध्या सोलापूरच्या रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडवर उपचार घेतोय. मात्र त्याला उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळेनासे झाल्याने त्याच्यावर दुर्धर प्रसंग ओढवला आहे. बालाजी कोळेकर त्याचे नाव आहे.
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून बालाजी कोळेकर कुर्डूवाडी परिसरातील कोणत्याही गावांत एखादा विचित्र अपघाची घटना घडलीच किंवा कोणत्याही प्रकारच्या रुग्णांना पुढील उपचाराच्या सेवेसाठी नेण्यासाठी सदैव पुढे असायचा. कोविडच्या या प्रादुर्भावातही उत्कृष्टपणे सेवा देणाऱ्या बालाजी कोळेकर या देवदूताला अनेक रुग्णांच्या सानिध्यात कोरोनाने गाठले. त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील एका मोठ्या डेडीकेटेड कोविड सेंटरमध्ये सध्या दाखल केले आहे. तो सध्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडवर अत्यावश्यक उपचार घेत आहे. त्याला रेमडेसिव्हर इंजेक्शनची गरज असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याला रेमडेसिविर इंजेक्शनच उपलब्ध होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
बालाजी कोळेकर हा येथील ॲम्बुलन्सचा चालक-मालक आहे. गेल्या १५ वर्षांपासून या परिसराला रुग्णसेवा देत आहे. त्याच्याकडे पाच छोट्या मोठ्या ॲम्बुलन्स आहेत. त्याच्याशिवाय येथील आरोग्य यंत्रणेला व खासगी डॉक्टरांना कोणाकडूनही ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध होत नाही. अशा व्यक्तीलाच या संकटकाळात एखादेही रेमडेसिविर इंजेक्शन न मिळणे म्हणजे खूपच भयानक आहे.