नगरपंचायत निवडणुकीचा राग, द्राक्षबागेतील घड तोडून 15 लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:55 IST2022-01-22T13:53:08+5:302022-01-22T13:55:29+5:30
वैराग येथील इस्माईल पटेल यांचे वैराग-तडवळे रोडवर ढोराळे हद्दीत दहा एकर शेत आहे. यापैकी अडीच एकर क्षेत्रावर माणिक चमन जातीचे द्राक्ष पीक असून, पुढील आठवड्यात विक्रीस जाणार होते.

नगरपंचायत निवडणुकीचा राग, द्राक्षबागेतील घड तोडून 15 लाखांचे नुकसान
सोलापूर/वैराग : येथील भाजपचे कार्यकर्ते इस्माईल पटेल यांच्या ढोराळे (ता. बार्शी) येथील अडीच एकर द्राक्ष शेतातील विक्रीस आलेले द्राक्ष घड तोडून पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याबाबत पटेल यांनी अज्ञात इसमांविरोधात वैराग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
वैराग येथील इस्माईल पटेल यांचे वैराग-तडवळे रोडवर ढोराळे हद्दीत दहा एकर शेत आहे. यापैकी अडीच एकर क्षेत्रावर माणिक चमन जातीचे द्राक्ष पीक असून, पुढील आठवड्यात विक्रीस जाणार होते. दरम्यान, गुरुवार ते शुक्रवाच्या मध्यरात्री अज्ञात इसमांनी नुकत्याच झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीतील आकसापोटी८० टक्के द्राक्ष घड तोडून जमिनीवर टाकले, तसेच ठिबक सिंचनच्या नळ्या, पाइप तोडून नुकसान केले. त्याचबरोबर इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची फिर्याद इस्माईल पटेल यांनी दिली आहे. दिवसभर पंचनामा करण्याचे काम सुरू राहिल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान, या घटनेचा छडा लावणार असल्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी सांगितले.
द्राक्ष हे पीक अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करून त्याची जोपासणा केली जाते. आणि पटेल यांचा माल आठ दिवसांत विक्रीस जात होता. आजपर्यंत ढोराळे शिवारात कोणत्याही शेतकऱ्यांनी एकमेकांची साधी पाइपलाइनही फोडली नाही. त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार असून, याच्या मास्टरमाइंडपर्यंत सखोल तपास करावा असे ढोराळेचे सरपंच राहुल खरात यांनी सांगितले.
माझा भाऊ इस्माईल हा भाजपचा कार्यकर्ता असल्याने २१ डिसेंबर रोजी झालेल्या वैराग नगरपंचायतच्या निवडणुकीत माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती; परंतु ती नाकारली होती. त्यानंतर १८ जानेवारी रोजी उर्वरित चार जागांच्या निवडणुकीत प्रभाग नऊमधून उमेदवारी करीत आग्रही होता. तेव्हाही दिली नसल्याने तो नाराज झाला होता. आणि याच घटनेतून कोणीतरी गैरसमज करून सूडबुद्धीने हा प्रकार केल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी इस्माईल यांचे बंधू याकूब पटेल यांनी केला.
मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल
पटेल यांचे राजकीय व सामाजिक कार्य सहन न झाल्याने व नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात राजकीय व्यक्तीनी आकसापोटी नुकसान केले आहे. त्याचा निषेध या विचार मंचच्या युवकांनी पत्रकाद्वारे केल्याचे हबीब नदाफ यांनी कळविले आहे.