अक्कलकोटमधील संतप्त शेतकऱ्यांनी चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले
By Appasaheb.patil | Published: June 5, 2023 04:54 PM2023-06-05T16:54:50+5:302023-06-05T16:55:15+5:30
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.
शंभुलिंग अकतनाळ
चप्पळगांव : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून शासनाने आमची चेष्टा केली आहे, आणि कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असून हे काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, या भूमिकेतून संतप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील इटगे, ब्यागेहळ्ळी परिसरात चालू असलेले ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले.
बाधित शेतीच्या मोबदल्यात चार लाखांपासून सात लाखांपर्यंत भरपाई शासनाने जाहीर केली आहे. मात्र ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मंजूर नाही. याबाबतीत गेल्या सहा महिन्यांपासून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर, आणि बार्शी येथील बाधित शेतकरी संतप्त झाले आहेत. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाधित शेतकऱ्यांनी सोलापूर आणि मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतीत व्यथा मांडली असता लवकरच बैठक लावून असे आश्वासन वेळोवेळी मिळाले.
मात्र अद्यापही बैठक न झाल्याने शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. मागील महिन्यात सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, महेश हिंडोळे, सुरेखा होळीकट्टी आणि बार्शीचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन बाधित शेतीच्या संदर्भात प्रश्न मार्गी लावावा याविषयी थेट विचारणा केली होती असे असूनही अजूनही बैठकीच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावरून कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्याने बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.
संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, बसवराज होळीकट्टी, प्रियंका दोड्याळे, परमेश्वर गाढवे, विकी गाढवे, अमोल वेदपाठक, महेश भोज, चेतन जाधव आदींसह चपळगाव, धोत्री, बोरेगांव, डोंबरजवळगे, तीर्थ, हालहळ्ळी(अ), चपळगाववाडी, दहिटणेवाडी, कोन्हाळी, अक्कलकोट ग्रामीण, हसापुर, इटगे, नागुर, बोरीउमरगे, मैंदर्गी, नागुर, दुधनी गावांतील बाधित शेतकरी यावेळी उपस्थित होते.