सोलापूरातील प्राणीप्रेम : २४ तास झाडावर राहूनही मांजरी परतली पुन्हा स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:51 PM2017-10-31T15:51:56+5:302017-10-31T15:56:38+5:30
एकवेळ माणूस विसरेल; जनावराला जीव लावला तर जनावर कधीच विसरत नाही, असे प्राण्यांबद्दल सहृदयी कौतुक आपल्याला कुठेही ऐकायला मिळते. याची प्रचिती एका मांजरीने दिली.
बाळासाहेब बोचरे
सोलापूर दि ३१ : एकवेळ माणूस विसरेल; जनावराला जीव लावला तर जनावर कधीच विसरत नाही, असे प्राण्यांबद्दल सहृदयी कौतुक आपल्याला कुठेही ऐकायला मिळते. याची प्रचिती सोमवारी एका मांजरीने दिली. घरापासून सहा किलोमीटर सोडून दिलेल्या मांजरीने जीव वाचविण्यासाठी २४ तास नारळाच्या झाडावर काढले आणि ज्यांनी सोडून दिले त्याच्या घरी सुखरुप परतली. योगायोग म्हणजे रविवारी जागतिक मांजरी दिन होता.
सोलापुरातील विजय अय्यर यांची कन्या प्रिया यांना प्राण्यांचा चांगलाच लळा. युनायटेड किंगडममधील एडिनबर्ग विद्यापीठाची पीएच़डी़ मिळविलेल्या प्रिया यांच्या दारात अडीच वर्षांपूर्वी एक मांजरीचे पिल्लू आले. त्यांनी त्याला जवळ केले; पण कुत्र्यांनी जखमी केल्याने ते पिल्लू मेले, असे त्यांनी गृहीत धरले. तथापि तब्बल १५ दिवसांनी ते पिल्लू परत प्रिया यांच्याकडे आले. त्याला प्रियांनी जीव लावला, तिला डमरू असे नाव दिले. गेल्या अडीच वर्षांत एकाची पाच मिळून घरात सहा मांजरे झाली. प्रिया या नोकरीसाठी पुण्याला जाणार असल्याने व प्रियाचे वडील आजारी असल्याने पुढे स्वच्छतेचा आणि देखभालीचा प्रश्न आल्याने प्रियांनी सर्व मांजरांना सोरेगाव येथील शेतात सोडण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी जागतिक मांजरी दिन आहे हे प्रियांच्या ध्यानीमनी नव्हते. शेतात सर्वजण रमतील असा त्यांनी विचार केला.
रविवारी त्यांनी साडेतीनशे रूपये भाडे देऊन एक पिंजरा आणला. पिंजºयात चार मांजरांना तर दुसºया दोन मांजरांना हातात धरुन चारचाकी गाडीतून नेले. तथापि डमरू अचानक हातातून पळाली. तिच्यामागे तीन-चार कुत्री लागल्याने ती घाबरुन नारळाच्या झाडावर जाऊन बसली. रात्री ११ वाजले तरी ती खाली न येता गुपचूप बसून राहिली. ती मेली की जिवंत याचीही कल्पना येईना. दुसºया दिवशी दुपारी काही प्राणिमित्र आणि अग्निशामक दलाच्या मदतीने तिला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता तिने थेट झाडावरुन प्रियाच्या अंगावर झेप घेतली. दरम्यान, कुत्री आल्याने ती उसात पळून गेली. ती सापडेना तेव्हा प्रियांना आपले काही तरी चुकत असल्याचा भास झाला. त्यांनी पाच पिल्लांना गाडीत घातले आणि परतीला निघाल्या. मात्र त्यांचे लक्ष मागे होते.
-------------------------
कारच्या चेसीला लटकत पाच कि.मी.चा प्रवास
पाच मांजरासह परतत असताना अशोकनगर येथे प्रिया यांना मांजरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी मागे पाहिले तेव्हा त्यांची डमरू एका मालवाहू वाहनाच्या आश्रयाला पळताना दिसली. आपली डमरू आपल्या गाडीला लटकून कधी सोबत आली याची कुणालाच कल्पना नव्हती. प्रिया त्या वाहनाखाली शिरल्या आणि खाली जाऊन डमरूला बाहेर काढले आणि छातीला कवटाळले तेव्हा कुठे भेदरलेली डमरू शांत झाली. डमरुला पाहून प्रियाचे डोळे भरुन आले . त्यांनी तिला आपल्या गाडीत बसविले आणि घरी आणले. सुमारे ३० तासांनंतर ती घरी आल्याने तेव्हा कुठे सहाही मांजरांचा जीव भांड्यात पडला आणि सर्व जण पुन्हा खेळायला लागले.