सोलापुरात प्राण्यांचे बाजार भरविण्यास परवानगी; जाणून घ्या सविस्तर अटी व शर्ती
By Appasaheb.patil | Published: January 6, 2023 08:12 PM2023-01-06T20:12:27+5:302023-01-06T20:14:30+5:30
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद करण्यात आलेले होते. जिल्ह्यामध्ये ...
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार बंद करण्यात आलेले होते. जिल्ह्यामध्ये गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झाल्याने ८ सप्टेंबर २०२२ चे आदेशान्वये लागू केलेले निर्बंध अंशतः शिथिल करण्यात आले असून. जिल्ह्यात केवळ म्हैस प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे व बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यामध्ये गोवंशीय प्राण्यांचे (गाय, बैल व वासरे ) बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. म्हैस प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे व बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येत असून वाहतूक अधिनियम २००१ मधील प्राण्यांची वाहतूक नियमांचे पालन करुन तसेच, जनावरांचा आरोग्य दाखला सोबत असणे बंधनकारक राहील. संबंधित ठिकाणी बाजारामध्ये जंतुनाशक फवारणी करणे बाजार समितीस अथवा आयोजकास बंधनकारक राहील.
महाराष्ट्र शासन अधिसूचना २१ नोव्हेंबर २०२२ नुसार जिल्ह्यामध्ये राज्यातील अमरावती व नाशिक महसुली विभागातील कोणत्याही जिल्ह्यामधून सोलापूर जिल्ह्यात गुरांची ने आण करता येणार नाही. तसेच पुणे, औरंगाबाद, नागपूर या महसुली विभागातून केवळ संक्रमित नसलेल्या आणि लसीकरण केलेल्या गुरांची सोलापूर जिल्ह्यामध्ये ने आण व वाहतूक परवानगी देण्यात येत आहे. तसेच सक्षम प्राधिकाऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र व अधिनियम २००१ मधील वाहतूक नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये यात्रेनिमित्त किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राण्यांचे प्रदर्शन भरविण्यास किंवा बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास कोणतीही परवानगी देण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले असुन लम्पी चर्मरोगाचा त्या भागातील प्रादुर्भाव व लागण असल्याचे प्रमाण विचारात घेऊन परिस्थितीनिहाय परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.