पशुपक्ष्यांचा जीव धोक्यात; नान्नज अभयारण्यातील पाणवठे पाण्याविना कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 05:33 PM2022-04-04T17:33:54+5:302022-04-04T17:34:02+5:30
पशुपक्ष्यांसह प्राण्यांची पाण्यासाठी धडपड; हातपंपालाही नाही पाणी
मार्डी : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज अभयारण्य असून या अभयारण्याकडे मार्डी,अकोलेकाटी, वडाळा हे विभाग येतात. या सर्व ठिकाणी अरण्यातील प्राणी व पक्षी यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणथळे आहेत,मात्र हे सर्व पाणवठे पाण्याविना कोरडे पडले आहेत. यामुळे पशुपक्ष्यांसोबतच प्राण्यांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन वैभवात भर घालणारे नान्नज अभयारण्य दिवसेंदिवस खूपच संकटात सापडत आहे. नान्नज अभयारण्यातील पशुपक्ष्यांसह प्राण्यांना मात्र पाणी व चाऱ्याच्या शोधार्थ जीव मुठीत धरून परिसरात भटकंती करावी लागत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. दरम्यान, अभयारण्यात असलेल्या हातपंपाला देखील पाणी नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. नान्नज अभयारण्यातील वनविभागात दहा ते पंधरा कर्मचारी आहेत. मात्र त्यांच्याकडूनही कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले.
------------
पाण्याच्या शोधात पशुपक्षी शेतात...
अभयारण्य क्षेत्रात पाणी नसल्याने अभयारण्यातील पशुपक्षी,प्राणी मार्डी, कारंबा,अकोलेकाटी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर दिसून येत आहेत. काही शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करून ठेवली आहे, शिवाय शेतात असलेल्या टाक्या, पाणवठे, शेततळे पाण्याने भरून ठेवले आहेत.
----------
आगीच्या घटनेत वाढ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज अभयारण्यात असलेले प्राणी सध्या पाण्याच्या विवंचनेत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने अभयारण्याला आगी लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गवत झाडी, झुडपे पूर्णपणे वाळली आहेत. जिल्ह्याचे वैभव असलेले माळढोक अभयारण्य सध्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे संकटात असल्याचे दिसून येत आहे. आग लावण्याच्या प्रकारामुळे अनेकदा गवताबरोबर वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना ताज्या आहेत.
---