पुरात वाहून गेलेल्या जनावरांची भरपाई मिळणार; अजित पवार यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:08 PM2020-12-10T13:08:07+5:302020-12-10T13:08:10+5:30

पोस्टमार्टेमऐवजी पंचनाम्यावर देणार मंजुरी

Animals swept away by the flood will be compensated; Orders of Ajit Pawar | पुरात वाहून गेलेल्या जनावरांची भरपाई मिळणार; अजित पवार यांचे आदेश

पुरात वाहून गेलेल्या जनावरांची भरपाई मिळणार; अजित पवार यांचे आदेश

Next

सोलापूर : अतिवृष्टीने भीमा, सीना व नीरा या नद्यांना आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या जनावरांची नुकसानभरपाई देण्यासाठी पोस्टमार्टेमऐवजी पंचनामे ग्राह्य धरा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहेत.

जिल्ह्यात १३ ऑक्टोबरपासून वादळी वाऱ्यासह झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर नद्यांना आलेल्या महापुराचा तडाखा जसा शेतीला बसला तसा जनावरांनाही बसला होता. यामध्ये ११ तालुक्यांतील ८४ गावांमधील जनावरे वाहून गेली तर काही जनावरे मृत्युमुखी पडली होती. यामध्ये गाई: १२९, बैल:८, वासरे: ४१, म्हैस: ४६, रेडके: ११, शेळ्या: १४४, करडे: ११, घोडा:१ आणि कोंबड्या: १४ हजार १७१ अशी संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत अहवाल सादर केला होता. यावरून शासनाकडे नुकसानभरपाई मागण्यात आली होती. शासनाने भरपाई मंजूर केल्यावर महसूल विभागातर्फे आता शेतकऱ्यांना मेलेला जनावराचा पोस्टमार्टेम अहवाल सादर करण्याची अट घातली आहे. पुरात वाहून गेलेल्या जनावरांचे पोस्टमार्टेम झालेच नसल्याने भरपाई मिळण्यास अडचण निर्माण झाली होती.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी मंगळवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे या मागणीकडे लक्ष वेधले. त्यावर अजित पवार यांनी तातडीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व शासनाचे सचिव यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व तत्काळ शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचे आदेश दिले.

तर पोस्टमार्टेम कसे होईल

पुरात वाहून गेलेल्या जनावरांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट कसले मागता. सांगलीमध्येही अशी समस्या निर्माण झाली होती. पंचनामा ग्राह्य धरून शेतकऱ्यांना तत्काळ मदत वितरित करा. अतिवृष्टीने नुकसान झालेली पिके, नदीकाठची जमीन, घरांची पडझड यासाठी निधी दिला आहे. निधी कमी पडत असेल तर आणखी मागणी करा, पण शेतकऱ्यांना मदत तातडीने द्या अशा सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय धरणे उपस्थित होते.

Web Title: Animals swept away by the flood will be compensated; Orders of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.