Digital Education; अंकोलीचा आॅनलाईन पॅटर्न पोहोचला सिंगापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:01 PM2020-08-26T12:01:46+5:302020-08-26T12:07:54+5:30
चार शिक्षकांचे परिश्रम : पहिली ते चौथीपर्यंतचा अभ्यासक्रम
महेश कुलकर्णी
कुरुल : अंकोली केंद्राच्या जिल्हा परिषद शाळेतील चार शिक्षक एकत्र येत आॅनलाईन अभ्यासक्रम तयार केला आहे. हा पॅटर्न सर्वत्र गाजत असून त्याचा डंका सिंगापुरात वाजत आहे.
वरकुटे येथील उपक्रमशील शिक्षक महेश गोडगे हे एकटेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास तयार करत होते. मात्र त्यासाठी खूप वेळ लागत होता़ त्यानंतर सहकारी दीपक पारडे, नेताजी रणदिवे व प्रदीप माळी यांच्याशी चर्चा केली़ या चौघांनी मिळवून अभ्यासक्रम तयार केला़ त्यात प्रदीप माळी यांनी पहिली, नेताजी रणदिवे यांनी दुसरी, दीपक पारडे यांनी तिसरी तर महेश गोडगे यांनी इयत्ता चौथीच्या आॅनलाईन अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली अन् सुरू झाला टीम अंकोली निर्मित आॅनलाईन अभ्यासाचा नवा पॅटर्न.
हा अभ्यास पीडीएफ स्वरूपात आहे. ठळक अक्षरात, आकर्षक रंगात, चित्रांसह हा अभ्यास तयार करत आहोत. प्रत्येक इयत्तेच्या घटकनिहाय सोप्या शब्दांत मांडणी केलेल्या या अभ्यासामध्ये स्वनिर्मित यूट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओही जोडले आहेत. त्यामुळे मुलांना अवघड घटक देखील चटकन समजू लागला़ या अभ्यासासोबत कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, योगासने यांचे व्हिडिओ देखील तयार करून या अभ्यासात जोडत असल्याचे त्यांनी सांगितले़ या अभ्यासात शेवटी ते मोबाईल क्रमांक देऊन अभ्यासाबद्दल प्रतिक्रिया मागवितात. त्यामुळे अनेक शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांच्या फोनद्वारे व मेसेजद्वारे प्रतिक्रिया येत आहेत.
असा चालतो अभ्यास
व्हॉट्सअॅप ग्रुपवर, ब्रॉडकास्टद्वारे रोज सकाळी हे चौघे हा अभ्यास पाठवितात़ त्यानंतर काही पालक तो अभ्यास इतर ग्रुपवर पाठवितात. असा या आॅनलाईन अभ्यासाचा प्रवास सुरू आहे. हा अभ्यास राज्यभर पोहोचत तर आहेच. याशिवाय या अभ्यासाचे पीडीएफमध्ये रूपांतर केल्याने ते सातासमुद्रापार सिंगापूर येथे पोहोचले आहे. तेथूनही अभ्यासाबद्दलची प्रतिक्रिया आल्याचे महेश गोडगे यांनी सांगितले़
१५ जूनपासून अविरत काम सुरू
दररोज सलग पाच ते सहा तास प्रत्येक जण घरीच काम करून अभ्यास तयार करत आहेत. यासाठी स्वत:चा लॅपटॉप, मोबाईल यांसह व्हॉट्सअॅप, यूट्यूब, फिल्ममेकर, पिक्सल लॅब, पिक्स आर्ट, इनशॉट आदी अॅपचा वापर करून आॅनलाईन अभ्यास तयार करीत आहेत. १५ जूनपासून आजवर अविरत या टीमचे कार्य सुरू आहे. या सर्व शिक्षकांचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, माढ्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, शिक्षण विस्तार अधिकारी विकास यादव यांनी कौतुक केले़