‘अंनिस’ने केले जटनिर्मूलन; पस्तीस वर्षानंतर महिलेची जटेतून मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 12:09 PM2021-08-23T12:09:02+5:302021-08-23T12:09:08+5:30
सोलापूर : मागील ३५ वर्षापासून असलेल्या जटेतून महिलेची मुक्तता करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून जटनिर्मूलन करण्यात आले. यामुळे ...
सोलापूर : मागील ३५ वर्षापासून असलेल्या जटेतून महिलेची मुक्तता करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून जटनिर्मूलन करण्यात आले. यामुळे महिलेची त्रासातून सुटका झाली.
हैदराबाद रोड, विडी घरकुल येथील तारामती महादेव कलशेट्टी (वय ६६) यांनी गेल्या ३५ वर्षांपासून जटा वाढविल्या होत्या. जटा वाढल्यामुळे त्यांना जीवघेणा त्रास होत होता. मानदुखी, डोकेदुखी, सारखी खाज सुटणे, चिडचिड होणे, झोप न येणे असा त्रास त्यांना होत होता. तारामती कलशेट्टी यांचे पती महादेव यांनी विडी घरकुलमधील सामाजिक कार्यकर्ते अंबादास गट्टी यांना ही व्यथा सांगितली. दोघांनी चर्चा करून अंनिसशी संपर्क साधला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शाखेतर्फे महिलांच्या जटा निर्मूलनासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत अंनिस राज्य समिती सदस्या निशा भोसले, कार्याध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, ॲड. सरिता मोकाशी, लता ढेरे व अंजली नानल यांनी जटानिर्मूलन केले. त्यांचे पती महादेव कलशेट्टी यांनी अंनिसचे आभार मानले. गरीब लोक अंधश्रध्देपोटी व जटा काढण्यास खूप खर्च येतो म्हणून त्रास सहन करतात, अशा लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसतर्फे करण्यात आले.