जयंती विशेष; अहिल्यादेवींनी जिल्ह्यात उभारलेल्या वास्तू, बारवचा होणार अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 12:16 PM2021-05-31T12:16:59+5:302021-05-31T12:17:05+5:30
सोलापूर विद्यापीठाचा उपक्रम : जीवनकार्यावर अध्यासनामार्फत संशोधन होणार
सोलापूर : एक कर्तृत्ववान उत्तम प्रशासक, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. अहिल्यादेवी एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. संपूर्ण देशभरात त्यांचे महान कार्य अजरामर आहे. सोलापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी उभारलेल्या वास्तू , शिल्प, वाडा, बारवा, मंदिरांचा विद्यापीठाकडून अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींची उद्या जयंती साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी ही माहिती दिली. सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्यानंतर अहिल्यादेवी यांच्या नावाने अध्यासन केंद्राची निर्मिती होत आहे. अध्यासन केंद्रांतर्गत अहिल्यादेवी यांच्या जीवनकार्यावर संशोधन व अभ्यास होणार आहे. यामुळे नव्या पिढीला अहिल्यादेवींचे आदर्श महान कार्य समजणार आहे आणि त्यातून त्यांना एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. याचबरोबर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवी यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार आहे. याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
पंढरपूर, सांगोल्यातील वास्तूंचे संशोधन
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी सोलापूर जिल्ह्यात विशेषतः पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या भागात निर्मिती केलेल्या वास्तू, शिल्प, वाडा, बारवा, मंदिरे जीर्णोद्धारांचा अभ्यास व संशोधन केले जाणार आहे. पुरातत्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया पाटील आणि इतर तज्ज्ञ संशोधकांकडून याचा अभ्यास होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. कठीण काळात अहिल्यादेवी होळकर यांनी संकटांचा सामना करत खूप मोठे महान कार्य केले आहे. अशा या महान राज्यकर्त्या असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांची उद्या (३१ मे) रोजी जयंती आहे. यानिमित्त विद्यापीठात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजिला आहे, असे त्यांनी सांगितले.