सोलापूर जिल्हा कारागृहातील आणखीन २६ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 03:12 PM2020-06-03T15:12:51+5:302020-06-03T15:29:47+5:30
६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह; यापूर्वी कर्मचाºयांसह ३७ जणांना झाली आहे बाधा
सोलापूर : सोलापूर जिल्हा कारागृहातील २६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, ६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळच्या सत्रात सिव्हिल हॉस्पीटलच्या प्रयोगशाळेकडून आलेले अहवाल प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये ४० जण पॉझीटिव्ह तर ११६ जण निगेटिव्ह आहेत. निगेटिव्हमधील ६७ जण जेलमधील आहेत.
जेलमधील कैद्याला सुरूवातीला लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर जेलमधील सर्व कैदी व कर्मचाºयांची तपासणी करण्याचा निर्णय जेल प्रशासनाने घेतला. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही तपासणी केली. यामध्ये दोन कर्मचारी व नंतर एकाचवेळी ३४ जण पॉझीटिव्ह आले. त्यानंतर मंगळवारच्या अहवालात २६ जण पॉझीटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर महापौर निवास, मरीआई चौक, कोंतम चौकातील धाकटा राजावाडा, न्यू पाच्छापेठ, सोमवारपेठ, जोडभावीपेठ, मुकुंदनगर, बुधवारपेठ,मराठावस्ती, कुमठानाका, मुरारजीपेठेतील एन. जी. मिल चाळीत रुग्ण आढळले आहेत.
------------
निगेटिव्ह रुग्णाकडे दुर्लक्ष
भवानी पेठेतील एका महिलेचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबातील १३ जणांना क्वारंटाईन केले आहे. पाच दिवसापूवीं स्वॅब घेतल्यावर मंगळवारी सकाळच्या सत्रात ७ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर सायंकाळच्या सत्रात ६ जणांचा अहवाल पॉझीटिव्ह आला. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना तातडीने बाजूला करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली तरी त्याची बुधवारी सकाळपर्यंत दखल घेण्यात आली नाही, अशी तक्रार येथील नगरसेवकाने केली आहे.