सोलापुरात आणखी एका स्कॅमचा झटका, २० % परतव्याचे आमिष; २३ लाखाला गंडा
By विलास जळकोटकर | Published: November 8, 2023 06:30 PM2023-11-08T18:30:45+5:302023-11-08T18:32:21+5:30
गोल्डीफाय एलएलपी रॉयल इन्व्हेस्टमेंट या कंपनीत २० टक्के परतव्याचे आमिष दाखवून तसे करारपत्र घेऊन गुंतवणूक करणाऱ्या तिघांना तब्बल २२ लाख ९८ ३१४ रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.
सोलापूर : अलीकडेच झालेल्या अनेटा स्कॅमचा झटका सोलापूरकर विसरले नाहीत तोच आणखी एक स्कॅम उघडकीस आले आहे. गोल्डीफाय एलएलपी रॉयल इन्व्हेस्टमेंट या कंपनीत २० टक्के परतव्याचे आमिष दाखवून तसे करारपत्र घेऊन गुंतवणूक करणाऱ्या तिघांना तब्बल २२ लाख ९८ ३१४ रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १३ डिसेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या काळात राघवेंद्र भवन दाजी पेठेतील दुकानाच्या गाळ्यात घडला.
याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. या फसवणुकीबद्दल अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय ५६, रा. २५/८ गौरांग बिल्डिंग,पद्मानगर, आरकाल गार्डनजवळ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र रमेश लांडे (वय- ३८) व अमृता बाबूराव रणसुभे (रा. सोलापूर) या दोघांविरुद्ध भादंवि ४०६,४२० ३४ सह महाराष्ट्र ठेवी हितसंबंध अधिनियम क अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादीत कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, दाजी पेठेतील दुकानाच्या गाळ्यामध्ये यातील संशयित आरोपी रवींद्र लांडे व अमृता रणसुभे यांनी गोल्डीफाय एलएलपी रॉयल इन्व्हेंस्टमेंट या कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर दर महिन्याला २० टक्के परतवा देण्याचे आमिष दाखवले. तसे करारपत्र लिहून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानुसार फिर्यादी अनिल कुलकर्णी यांनी १६ लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणुकीच्या मोबदल्यात २० टक्के परतावा देण्याचे कबूल केले. २७ डिसेंबर २०२१ व ३ जानेवारी २०२२ रोजी करारपत्र लिहून दिले. सुरुवातीला वरील आरोपींनी फिर्यादीला ९८ हजार ६०० एवढी रक्कम वेळोवेळी दिली. मात्र, ६ लाख १४ हजार रुपये अद्याप दिले नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आणखी दोघांनाही असेच गंडवले
याच बरोबर फिर्यादी कुलकर्णी यांच्याप्रमाणेच जयेश संगा यांचे ७ लाख ७० हजार रुपये, संतोष पारशेट्टी यांचे ९ लाख १४ हजार ३१४ रुपये आरोपींनी परतवा देण्याचे आमिष दाखवून ३७ लाख ७४ हजार ३१४ रुपये गुंतवणूक करून घेतले. मात्र, कबूल केल्याप्रमाणे परतावा न देता असे एकूण २२ लाख ९८ हजार ३१४ रुपये अशी तिघांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.