पाण्याच्या शोधात काळविटांची सैरभैर; हिरज परिसरातील पाणवटे भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 03:48 PM2020-04-30T15:48:12+5:302020-04-30T15:50:14+5:30
हिरज परिसरातील वनविभागाने गस्तही वाढविली; तहानेने व्याकूळ होऊन काळविटांचा झाला होता मृत्यू
सोलापूर : हिरज परिसरात मागील काही दिवसांमध्ये तीन काळविटांचा मृत्यू झाला होता. तसेच एक काळवीट अपघातात जखमी झाले होते. पाण्याच्या शोधात असलेल्या काळविटांना कुत्र्याने चावा घेतल्याने काळविटांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर वनविभागाने पावले उचलत परिसरातील पाणवठे पाण्याने भरले आहेत.
हिरज परिसरात असलेल्या डेंटल कॉलेजच्या बाहेर सहा दिवसांपूर्वी कुत्र्याने एका काळविटावर हल्ला केला होता. या काळविटाच्या पायात शिकारीचा सापळा आढळून आला. या दरम्यान कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारी डीएसके शोरुमबाहेर पाण्याचा शोध घेत असताना एका कारने काळविटाला धडक दिली. यात काळवीट जखमी झाले आहे.
तर हिरज परिसरातच आठ दिवसांपूर्वी पाण्याच्या शोधात असणाºया दोन पाडसांवर कुत्र्याने हल्ला केला. यात दोन्ही पाडसांचा मृत्यू झाला होता. मागील काही दिवसांपासून अशा प्रकारात वाढ होत होती. याबाबत वन्यजीवप्रेमींनी काळजी व्यक्त करत वन विभाग व वन्यजीव विभागाला लक्ष देण्याची मागणी दिली होती.
उन्हाळ्यामुळे हिरज परिसरातील पाणवठे कोरडे पडले आहेत. तिथे पाणी मिळत नसल्याने काळवीट हे सोलापूर-पुणे रोड परिसरात फिरत आहेत. परिसरात शिकारींनी सापळे लावल्याचे निदर्शनास आले. एक सापळा वनविभागाने आपल्या ताब्यातही घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र सध्या माणसांचा वावर कमी झाला आहे. तसेच प्रशासनाच्या आदेशानुसार वन कर्मचाºयांची संख्या कमी केली आहे. याचा गैरफायदा घेत झाडे तोडणे तसेच शिकारीचा प्रयत्न करण्यात आला होता.
हिरज परिसरामध्ये नियमितपणे गस्त घालण्यात येत आहे. वनमजूर यांना अतिशय दक्ष देऊन काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यासोबतच वन्यजीव विभागालाही यासंदर्भात संपर्क साधून त्यांनाही या बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत.
- चेतन नलावडे,
वन परिमंडळ अधिकारी