'कोणत्याही परिस्थितीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडूच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 13:35 IST2021-12-20T13:35:19+5:302021-12-20T13:35:58+5:30
संपातील कर्मचाऱ्यांची विनामोबदला बाजू मांडणारे ॲड. सदावर्ते यांनी नांदेड येथील एक खासगी कार्यक्रम संपवून परत मुंबईला जाताना बार्शी येथे बस आगारातील संपात असलेल्या कामगारांची भेट घेतली.

'कोणत्याही परिस्थितीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडूच'
सोलापूर/बार्शी : राज्यातील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो लढा उभा केला, त्यात कोणत्याही संघटनेचा संबंध आहे. ही लढाई सीमेवरच्या सैनिकांप्रमाणेच आहे. सरकार वेळकाढूपणा करत असले तरी कोणत्याही परिस्थतीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असा विश्वास ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला.
संपातील कर्मचाऱ्यांची विनामोबदला बाजू मांडणारे ॲड. सदावर्ते यांनी नांदेड येथील एक खासगी कार्यक्रम संपवून परत मुंबईला जाताना बार्शी येथे बस आगारातील संपात असलेल्या कामगारांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रथम तेथील शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुहास भालेकर, नितीन गवळी, रामदास भाकरे, उमेश पवार, फिरोज मुलानी, कपिल लुकडे, हेमत साठे, संतोष गुंड, यांच्यासह भूम, तुळजापूर ,सोलापूर, कुर्डूवाडी या आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले, सध्या सरकार विविध मार्गांनी हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करीत असले तरी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, एकी तोडू नका, असे म्हणत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या 45 दिवसांपासून संपावर आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी त्यांचा संप सुरू आहे. या संपाबाबत, आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.