पक्ष कोणताही..परंतु माढा लोकसभेचा खासदार म्हणे रणजितसिंह मोहिते-पाटीलच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:56 PM2019-03-14T12:56:41+5:302019-03-14T12:59:08+5:30
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच कायम असताना मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘विकासाचा वारसदार, रणजितदादा पुन्हा खासदार’ ...
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच कायम असताना मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘विकासाचा वारसदार, रणजितदादा पुन्हा खासदार’ अशी चर्चा सुरू केली आहे. यामुळे, पक्ष कोणताही मात्र रणजितदादांना खासदार करणारच, ही त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट झाली आहे.
शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता कोणत्याही परिस्थितीत माढ्याच्या मैदानात उतरायचे, असा निर्णय घेऊन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माढ्यातून लढणार नसल्याचे पुण्यात स्पष्ट केले. या बैठकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्याला जिल्ह्यातील नेत्यांनी विरोध केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही रणजितदादांच्या नावाला विरोध असल्याचे सांगितले. पण हा विरोध यापूर्वी झाला होता.
आता आम्ही विरोधाचा सामना करायला तयार आहोत, असे मोहिते-पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा विषय शरद पवार यांच्या गोटात ढकलला. त्यामुळे रणजितसिंहांनी त्याच दिवशी मुंबई गाठली. सकाळी भाजपाचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. रणजितसिंह कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण जवळच्या कार्यकर्त्यांनी मोहिम सुरू केल्याचे दिसून येत आहे.
मोहिते-पाटलांची दोन्ही पक्षांकडून कोंडी
- च्एकीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांनी रणजितदादांच्या उमेदवारीला विरोध केला तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी त्यांना प्रतीक्षेत ठेवले आहे. यामुळे दोन्ही पक्षांकडून मोहिते-पाटलांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.