गेली मंडई कुणीकडे...; रस्ते पर की भाजी बेचनेवालो को मंडई में ले के आओ.. अद्दा तोला सुन्ना देती ...!
By Appasaheb.patil | Updated: January 3, 2019 14:52 IST2019-01-03T14:48:33+5:302019-01-03T14:52:01+5:30
आप्पासाहेब पाटील सोलापूर : ओ़.. क्या हैं ओ़.. क्या भी करो.. लिखो.. कुछ नही होता.. बहोत सारे सायबाँ आके चले गये.. अब तक तीन-तीन ...

गेली मंडई कुणीकडे...; रस्ते पर की भाजी बेचनेवालो को मंडई में ले के आओ.. अद्दा तोला सुन्ना देती ...!
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ओ़.. क्या हैं ओ़.. क्या भी करो.. लिखो.. कुछ नही होता.. बहोत सारे सायबाँ आके चले गये.. अब तक तीन-तीन कमिशनरभी आके गये..कुछ नही हुआ.. तुम्हारा क्या ओ.. बाहर का भाजी मार्केट अंदर ले के दिखावो...तुम्हारे को अद्दा तोला सुन्ना देती...! हे बोल आहेत जुळे सोलापूर भागातील भारती विद्यापीठाशेजारी असलेल्या संत जनाबाई भाजी मंडईतील विक्रेत्या महिलेची...
सोलापूर शहरातील भाजी मंडईमधील सद्यस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी लोकमत चमू शहरातील विविध भाजी मंडयांकडे नजर टाकत आहे़ नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकमत चमूने जुळे सोलापूर भागातील भारती विद्यापीठाशेजारी असलेल्या संत जनाबाई भाजी मंडईची पाहणी केली़ या पाहणीदरम्यान मंडईत प्रवेश करताच मंडईत शुकशुकाट होता़ भाजी विक्रेत्यांना बसायला केलेले कट्टे रिकामेच होते़ २०० लोकांची बसायची व्यवस्था असलेल्या कट्ट्यांवर एकही भाजीविक्रेता दिसला नाही़ रिकाम्या पिशव्या, रिकामी पोती, कट्ट्यावर बसलेले कुत्रे, कट्ट्याभोवती लावलेल्या रिकाम्या हातगाड्या, सायकल असेच चित्र पाहावयास मिळाले़ मंडईतून बाहेर पडताच गेटवर बसलेले तीन भाजीविक्रेते दिसले़ त्यातील महिला भाजीविक्रेत्यास अशी का परिस्थिती झाली, असे विचारताच त्यांनी सांगितले की, साहेब बाहेर रोडला ठिकठिकाणी भाजी विकणारे बसलेले आहेत़ गिºहाईक रोडवर बसलेल्या विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करतात अन् घरी निघून जातात़ एवढ्या आत कोण यावं अन् भाजी खरेदी करावं, असाही प्रश्न आहे़ शिवाय कोणत्याही प्रकारचे भाडे, पावती नसल्याने विक्रेते रस्त्यांवर भाजी कमी दरात विकून रिकामे होतात़ आम्ही प्रामाणिकपणे मंडईत बसतो अन् नुकसान करून घेतो़ पुढे असाच प्रवास करीत विजापूर रोडवर फेरफटका मारला़ यावेळी आयटीआय शासकीय महाविद्यालय, सैफुल, शासकीय मैदान, कंबर तलाव परिसर आदी ठिकाणी रस्त्यांवर भाजी विकतानाचे चित्र पाहावयास मिळाले़
रस्त्यांवर अतिक्रमण; वाहतुकीचा खेळखंडोबा...
- सध्या चौकाचौकात भाजीवाले, किरकोळ विक्रेते यांनी प्रचंड अतिक्रमण केले आहे. भाजीवाले पदपथासह चौकाचौकात मालवाहू रिक्षांमधून भाजी विक्री करताना दिसत आहेत. यामुळे मुख्य रस्त्यांवर प्रचंड गर्दी होऊन अपघातही होत आहेत. ग्राहक भाजी खरेदी करताना दुचाकी आणि चारचाकीतून खाली न उतरताच भाजी खरेदी करत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते. ट्रॅफिकमध्ये वाहनांची घासाघासी झाल्यास वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. यामुळे मारामारीचेही प्रसंग घडतात. याकडे पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन आदींकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. जे सर्वसामान्य नागरिकांना दिसते ते पोलीस आणि प्रशासन यांना कसे दिसत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
रस्त्यांवरील भाजी विक्रेत्यांवर कोणाची मेहरबानी...
- भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला जगण्याचा, पोटभर जेवण्याचा अधिकार दिला आहे. यासाठी प्रशासनाने योग्य जागेत लाखो रुपये खर्च करून मंडईसाठी दुमजली इमारत उभी केली आहे. सर्व सेवासुविधांची पूर्तता केली़ यामध्ये भाजीविके्रते, फळविक्रेते, किरकोळ विक्रेते आदींना जागा देण्यात आल्या आहेत; मात्र अधिक नफा मिळविण्याच्या प्रयत्नात फिरते विक्रेते चौकाचौकात आणि पदपथावर भाजीविक्रीची दुकाने थाटत आहेत; मात्र एवढ्या अडचणी असूनही भाजीविक्रेत्यांनी थाटलेली दुकाने कोणाच्या आशीर्वादाने चालवली जात आहेत, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
आम्ही पावती फाडतो... घाबरायचे कशाला...
- लोकमत चमूने रस्त्यावर बसलेल्या एका भाजीविक्रेत्यास तुम्ही रस्त्यावर का बसता़़़ भाजी मंडईत का बसत नाही़़़ तुम्हाला अतिक्रमण अथवा पोलिसांनी कधी विचारणा केली नाही का, कारवाई केली नाही का? असे विचारले असता त्या भाजी विक्रेत्यांनी सांगितले की, आम्ही रितसर पावती फाडतो, त्यामुळे घाबरायचे कशाला, असे उत्तर दिले़ दुपारी बाराच्या सुमारास व संध्याकाळच्या वेळेत शाळा, महाविद्यालये सुटतेवेळी चौकात आणि पदपथावर प्रचंड गर्दी होते. यावेळी विद्यार्थी आणि नागरिक यांना पदपथावरून धड चालताही येत नाही. अशातच रस्त्यावर बसलेल्या भाजीविक्रेत्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते़ एखादी दुर्घटना घडल्यास तेवढ्यापुरते अतिक्रमण काढले जाते; मात्र पुन्हा ४-५ दिवसात परिस्थिती ‘जैसे थे’च.!