टेबलावरील मेनूकार्डऐवजी अॅप; खवैय्यांची नोंद अन् डिजिटल पेमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:11 PM2020-10-06T12:11:33+5:302020-10-06T12:13:26+5:30
सहा महिन्यानंतर सोलापुरातील रेस्टॉरंट सुरू; सहकुटुंब हॉटेलिंगचा आनंद
सोलापूर : कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स्, रेस्टॉरंट्स सोमवारपासून सुरु झाले आहेत. यामुळे आता सहकुटुंब हॉटेलिंगचा आनंद सोलापूरकरांना घेता येणार आहे.
हॉटेलात आलेल्या ग्राहकांच्या स्वागताबरोबरच त्यांना सॅनिटायझर, मास्क वापरण्याची विनंती करण्यात आली. पहिल्या दिवशी ग्राहकांची संख्या कमी असली तरी ग्रामीण भागातून शहरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची संख्या जास्त असल्याचे व्यावसायिक प्रभाकर गौडनवरु यांनी सांगितले. चार जणांची क्षमता असलेल्या टेबलावर फक्त दोघे बसत आहेत. सध्या आचारीही कमी असल्याने मांसाहारी पदार्थांची संख्या कमी आहे. इतके घरी साधे जेवण घेतल्याने आता उत्तर भारतीय पदार्थांना पसंती मिळत आहे. येत्या दोन-तीन दिवसात ग्राहकांची संख्या वाढेल, अशी आशा व्यावसायिकांनी व्यक्त केली.
नव्या तंत्रज्ञानाचा अधिक वापर..
कमीत कमी संपर्क व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये मेनूकार्ड ऐवजी क्यूआर कोडद्वारे अॅपचा वापर करून आॅर्डर घेतली जात आहे. तर झालेल्या बिलाचे पैसेही आॅनलाईन पेमेंटद्वारे दिले जात आहेत. ग्राहक येताना त्याची संपूर्ण माहिती नोंदवून घेतली जात आहे.
मागील सहा महिन्यांपासून हॉटेल सुरु होण्याची वाट पाहत आहे. वेगळी चव चाखण्यासाठी हॉटेलमध्ये आलो आहे. स्वत:ची काळजी म्हणून येथे येताना मास्क, सॅनिटायझर सोबत घेऊन आलो आहे.
-परशुराम कांबळे, ग्राहक
प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहोत. सर्व कर्मचाºयांना एन-९५ मास्क, हँडग्लोव्हज वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. थोड्या दिवसात व्यवसाय पुर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.
-नवनाथ इंदापुरे
हॉटेल व्यावसायिक
दरात बदल नाही
मागील सहा महिन्यात तेल,डाळी, बेसन या सर्वांचे दर वाढले आहेत. त्या अनुषंगाने दर वाढवणे गरजेचे होते; मात्र ग्राहक आर्थिक अडचणीत असल्याने दर वाढवले नाहीत. व्यवसाय सुरळीत झाल्यानंतर दर वाढण्याची शक्यता आहे.