वैद्यकीय साहाय्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:52+5:302021-06-22T04:15:52+5:30
अक्कलकोट : केंद्रीय सामाजिक न्याय सबलीकरण विभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय साहाय्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिपाइंचे ...
अक्कलकोट : केंद्रीय सामाजिक न्याय सबलीकरण विभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय साहाय्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन नवी दिल्ली यांच्यावतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या रुग्णांसाठी हृदय शस्त्रक्रियेसाठी १.२५ लाख, किडनी शस्त्रक्रियेसाठी ३.५ लाख, कर्करोग, किमोथेरपी, रेडिओ थेरपीसाठी १.७५ लाख, मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी १.५ लाख, किडनी किंवा अवयव प्रत्यार्पणासाठी ३.५ लाख, पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख, तसेच इतर जीवघेण्या आजारासाठी १ लाख अशी आर्थिक मदत मिळते.
या मदतीच्या लाभासाठी रुग्ण हा अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमातीचा (ST) असावा आणि वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत असावे. अर्ज करताना खालील प्रमाणपत्रे जोडावीत. संपूर्ण भरलेला अर्ज, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, वैद्यकीय अधीक्षकांनी प्रमाणित केलेले खर्चाचे कोटेशन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अक्कलकोट तालुक्यातील सर्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अविनाश मडिखांबे यांनी केले आहे.