मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह ऑनलाइन साजरा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:40+5:302021-05-28T04:17:40+5:30
वडवळ : किशोरवयीन मुलींची कुचंबणा होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा ...
वडवळ : किशोरवयीन मुलींची कुचंबणा होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा असून, जागतिक स्तरावर २०१४ पासून, २८ मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, सध्या शाळाच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन माध्यमातून विविध उपक्रम राबवून हा सप्ताह साजरा करण्यात यावा, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार शिक्षा मंत्रालय) यांनी स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय हे राष्ट्रीय अभियान सुरू केले. शालेय शिक्षण विभाग व युनिसेफच्या सहकार्याने, सन २०१९ मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील ५ महिला शिक्षकांना मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर यावर्षी, २८ मे ते ५ जून २०२१ या कालावधीत मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह सर्व जिल्ह्यांनी साजरा करावा, असे पत्राद्वारे सूचित केले आहे.
हे उपक्रम घ्यावेत
मासिक पाळी उपक्रमाच्या यशोगाथाचे ऑनलाइन प्रकाशन, मुले पुरुषांच्या निबंध स्पर्धा, पोस्टर, चित्रकला, रांगोळी, कविता स्पर्धा, मासिक पाळी चॅम्पियन्स, हे उपक्रम असतील.
----