सोलापूर शहर पोलिसांचे आवाहन; नवीन वर्षाचे स्वागत घरातूनच करा साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 04:30 PM2021-12-30T16:30:24+5:302021-12-30T16:30:31+5:30
फटाके उडवल्यास दाखल करणार गुन्हे
सोलापूर : ओमायक्रॉन विषाणू प्रजातींचे संक्रमण होण्याची दाट शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ३१ डिसेंबर हा वर्षाखेर व नवीन वर्षाचे स्वागत घरात बसून साध्या पद्धतीने करावे. नववर्षाचे स्वागत म्हणून फटाके उडवल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिला आहे.
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्याने संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२१ रोजी व १ जानेवारी २०२२ रोजीच्या आदेशान्वये राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यपदार्थगृहे इत्यादींना अटी व शर्थी घालून देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही. फिजिकल डिस्टन्सिंग राखावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. ६० वर्षांवरील नागरिक व १० वर्षांखालील मुलांनी घराच्या बाहेर जाणे टाळावे. फटाक्यांची आतशबाजी करू नये, ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने त्याचे काटेकोर पालन करावे. शहरातील हाउसिंग सोसायटी, अपार्टमेंट, खाजगी ठिकाणे, फार्म हाउस इत्यादी ठिकाणी नववर्षाच्या स्वागतानिमित्त गर्दी करू नये, फटाके फाेडून नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर ध्वनी व वायुप्रदूषण कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त यांनी दिला आहे.
ध्वनी, वायुप्रदूषण कायद्यातील तरतुदी
० वायुप्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९८१ व ध्वनिप्रदूषण नियम २०० चे कलम ३९ अन्वये ३ महिने शिक्षा व १० हजारांचा दंड. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये पाच वर्षांची शिक्षा व एक लाख रुपयांचा दंड. विस्फोटक अधिनियम १८८४ चे कलम ९ (बी) चे कलम अन्वये ३ वर्षे शिक्षा व पाच हजारांचा दंड होऊ शकतो.
फटाके फोडल्यास एक लाखापर्यंतचा दंड
० निवासी क्षेत्रात व शांततेच्या ठिकाणी फटाके फोडल्यास किमान एक हजार ते तीन हजारांपर्यंतचा दंड. मिरवणूक नियमाचे उल्लंघन केल्यास १० ते २० हजारांचा दंड. सभागृह मंगल कार्यालय, सार्वजनिक सभागृह लॉन्स येथे फटाके फोडल्यास २० हजारांचा दंड. दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी फटाके फोडल्यास ४० हजारांचा दंड केला जाणार आहे. तिसऱ्यांदा फटाके फोडल्यास एक लाख रुपयांचा दंड व मालमत्ता सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.