शेतकरी योजनांसाठी १ लाख ९७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:21 AM2021-05-23T04:21:56+5:302021-05-23T04:21:56+5:30
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली महाडीबीटी पोर्टलवर विकसित केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ...
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली महाडीबीटी पोर्टलवर विकसित केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ३७९ लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झाले आहेत. त्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत प्राप्त १ लाख १५ हजार ९४४ अर्जांपैकी १००१ अर्जांची निवड झाली आहे. त्यातील १५६ अर्जांना पूर्वसंमती दिली असून २९ अर्ज अनुदान मागणीसाठी सादर केले आहेत. तर १९ लाभार्थ्यांना १५ लाख ४९ हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे.
अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ऊस, पौष्टिक तृणधान्य, गहू, कडधान्य यासाठी २१ हजार ३०३ शेतकऱ्यांच्या प्राप्त अर्जांपैकी १५१९ अर्जांची निवड झाली. त्यातील ४ अर्जांना पूर्वसंमती दिली असून ४ अर्ज अनुदान मागणीसाठी सादर केले होते. त्यांना ४ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ड्रीप व स्प्रिंकलरसाठी ३६ हजार ७१० शेतकऱ्यांच्या प्राप्त अर्जांपैकी ११ हजार२७० अर्जांची निवड झाली. त्यातील ४ हजार १०२ अर्ज पूर्वसंमतीसाठी सादर केले आहेत.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ट्रॅक्टरसाठी ८१ अर्ज, कांदाचाळ उभारणी १९ हजार ८६० अर्ज, हरितगृह उभारणी ३४२ अर्ज, शेडनेट हाऊस ९९९ अर्ज, प्लास्टिक मल्चिंग १ हजार २२१ अर्ज असे एकूण २२ हजार ४२२ प्राप्त अर्जांपैकी २५४ अर्जांची निवड केली आहे. ट्रॅक्टरसाठी आलेल्या ३० अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. त्यापैकी ८ अर्ज अनुदान मागणीसाठी सादर केले असून त्यांना ७ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे.
कोट ::::::::::::::::
महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान, अन्न सुरक्षा अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या प्राप्त अर्जांपैकी १४ हजार ०४४ अर्जांची निवड केली तर ४ हजार ६३२ अर्जांना पूर्वसंमती दिली आहे. त्यातील ४१ लाभार्थ्यांनी अनुदान मागणीसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३१ लाभार्थ्यांना २७ लाख ८६ हजार रुपयांचे अनुदान वाटप केले.
- रवींद्र माने
जिल्हा कृषी अधीक्षक