'एमबीए'च्या मुलांनाही कॅरी ऑनचा निर्णय लागू करा
By संताजी शिंदे | Published: October 22, 2023 01:41 PM2023-10-22T13:41:56+5:302023-10-22T13:42:53+5:30
विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून १० ऑक्टोंबर रोजी सर्व शाखेमधील, पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्र एक, दोन, तीन व चार च्या परीक्षेमध्ये कॅरीऑनचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर : ज्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाने पदवीला कॅरीऑनचा निर्णय घेतला, तसा नियम एमबीएच्या विद्यार्थ्यांना लागू करावा अशी मागणी बहुजन स्टुडंट फोरमच्या वतीने परिक्षा नियंत्रक मलिक रोकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून १० ऑक्टोंबर रोजी सर्व शाखेमधील, पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्र एक, दोन, तीन व चार च्या परीक्षेमध्ये कॅरीऑनचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या भूमिकेचे बहुजन स्टूडेंट फोरम स्वागत करते, मात्र पदवी मधील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला नाही.
व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या एमबीए अभ्यास वर्गासाठी हा निर्णय लागू करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जायचा धोका निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणून पदवीप्रमाणे एमबीएच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॅरी ऑनचा निर्णय घेण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाचेल म्हणून, बहुजन स्टुडन्ट फोरमच्या वतीने कुलगुरूंनी एमबीएच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन चा निर्णय लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे.