कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात स्वच्छतेसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By Appasaheb.patil | Published: October 31, 2022 04:27 PM2022-10-31T16:27:12+5:302022-10-31T16:27:19+5:30
पंढरपूर नगरपालिका प्रशासन झाले सज्ज
पंढरपूर :- कार्तिक शुद्ध एकादशी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून, कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यात्रा भाविकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
कार्तिकी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र,वाळवंट, ६५ एकर परिसर ,पत्रा शेड, दर्शन बारी आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी १३४८ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये ३४८ कायम तर १००० हंगामी कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी तसेच खजगी विहिरींचे क्लोरीनेशन करण्यात आले आहे .तसेच शहरासह ६५ एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह ,मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या ,कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट ६५ एकर परिसर, रेल्वे मैदान या आवश्यक ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार आहेत. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी माळी यांनी दिली.
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यासह प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीचे काम सुरु असून काही ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ६५ एकर येथे अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी १६ मिटर उंचीचे ६ हायमास्ट दिवे व १६० लॅम्प चालू करण्यात आले आहेत तसेच सार्वजनिक शौचलयातही लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीपात्र येथे २० मीटर उंचीचे ९ हायमास्ट दिवे चालू केले असून सर्व घाटांवर तसेच पत्राशेड व वाहनतळ येथेही लाईट व्यवस्था करण्यात येत आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्या असून, शहरातील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यासाठीत पथकाची नेमणूक करण्यात आली आहेत. शहरातील विविध ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरु असून,आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आली आहेत. तसेच शहरात विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी माळी यांनी सांगितले.