मूल्यांकनाचे निकष निश्चित
By Admin | Published: June 9, 2014 01:03 AM2014-06-09T01:03:28+5:302014-06-09T01:03:28+5:30
शासन आदेश जारी: जिल्ह्यात ८०० प्राध्यापकांना मिळणार लाभ
सोलापूर : राज्यातील कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या मराठी माध्यमाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना अनुदान सूत्र लागू करण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून ४ जूनच्या निर्णयान्वये मूल्यांकनाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत़ या निकषांमुळे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या १० हजार तर जिल्ह्यातील ८०० प्राध्यापकांचा वेतनाचा प्रश्न मिटला आहे़
पहिल्या टप्प्यात २६ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द वगळण्याचा निर्णय झाला होता़ आताच्या निर्णयान्वये शाळांचे मूल्यांकन सुरु झाल्याने वेतन या विषयाला गती मिळाली आहे़
काही कनिष्ठ महाविद्यालयांचा सुधारित सेवकसंच नसल्याने पद मंजुरीची कार्यवाही करण्यात आलेली नाही़ या प्रश्नावर कृती समितीच्या शिष्टमंडळाने पुणे विभाग उपसंचालिका सुमन शिंदे यांना भेटून निवेदन दिले़ तसेच या महाविद्यालयांचा रोष्टर तपासून शिक्षक मान्यतेसाठी शिबीर लावण्याबाबत विचारणा करण्यात आली़ यावर उपसंचालकांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले़ या शिष्टमंडळात कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, कार्याध्यक्ष मारुती गायकवाड आदी सहभागी झाले होते़ -------------------------
पात्रतेसाठी आवश्यक गुण
शासननिर्णयानुसार विज्ञान शाखेसाठी १०० गुण व कला, वाणिज्य शाखेसाठी ९४ गुण विहीत करण्यात आले आहेत़ त्यानुसार शैक्षणिकदृष्ट्या मागास गटातील विज्ञान शाखेसाठी ६५ गुण व कला, वाणिज्य शाखेसाठी ६१ गुणांची गरज आहे़ तसेच इतर गटात विज्ञान शाखेसाठी ७० गुण तर कला, वाणिज्य शाखेसाठी ६६ गुण पात्र होतील, अशा शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित होतील़ तथापि या करिता शाळेची शैक्षणिक गुणवत्ता या बाबीसाठी विहीत केलेल्या ५० गुणांपैकी ७५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे़
-----------------------------
मूल्यांकनाचे निकष़़़
शाळेची शैक्षणिक गुणवत्ता (५० गुण)
उच्च माध्यमिक शाळेसाठी प्रत्येक वर्गाच्या हजेरीचे प्रमाण (१० गुण)
शालांत परीक्षेचा निकाल (१० गुण)
परीक्षेतील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण (०५ गुण)
शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संख्येचे प्रमाण (०५ गुण)
कमी विद्यार्थी गळतीचे प्रमाण (०५ गुण)
शाळेमध्ये आधुनिक उपकरणांचा अध्यापनासाठी वापर (०५ गुण)
शाळेमध्ये शिकणाऱ्या शिक्षकांचा दर्जा (०५ गुण)
कार्यकक्ष शालेय व्यवस्थापन (०५ गुण)
---------------------------