मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारक आराखड्याला लवकरच मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 02:02 PM2019-07-23T14:02:55+5:302019-07-23T14:05:51+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन: दोन वर्षांपासून रखडलेला प्रश्न लागणार मार्गी
मुंबई/मंगळवेढा : मंगळवेढा येथील जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आराखड्यास १५ दिवसांच्या आत मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आलेल्या बैठकीत दिले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याने लिंगायत बांधवातून समाधान व्यक्त होत आहे.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वर स्मारक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून स्मारकासाठी जागा व निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार गंगाधर पटणे, झेडपी आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनी स्मारकाच्या जागेचा रखडलेला प्रश्न मार्गी लावून निधी उपलब्ध होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला.
बसव संदेश यात्रा, बसव राज्यव्यापी संमेलन यासह विविध उपक्रमाद्वारे बसवेश्वर स्मारक उभारणीबाबत राज्यभर जनजागृती करण्यात आली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात या स्मारकासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने यापूर्वी सादर केलेला आराखडा तीन वेळा नाकारण्यात आला होता. तांत्रिक कारणे व त्रुटी काढून हा आराखडा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. १४९ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून राज्याच्या मुख्य सचिवांकडे ठेवण्यात आला होता.
मुख्य सचिवांनी आराखड्यातील बांधकामावर आक्षेप घेत या ठिकाणी बांधकाम कशाला करता? असा मुद्दा उपस्थित केला. १४९ कोटींच्या आराखड्याला बांधकामासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. बसव सृष्टी, हॉल, ३० मीटर उंचीचे स्मारक, ध्यान मंदिर, प्रशासकीय इमारत आॅडिओ व्हिज्युअल रुम या कामाचा अंतर्भाव आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंधरा दिवसांत महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीत तातडीने मंजुरी देण्यात येईल असे सांगितले. तसेच या स्मारकामध्ये कल्याण मंडप, भव्य पुतळा, त्यांच्या चरित्रावर आधारित वाचनालय, लेझर शो याचा समावेश असावा अशा सूचना केल्या. उभारणीच्या कामाला गती येणार हे निश्चित असून याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सततच्या त्रुटींमुळे पालकमंत्री वैतागले...
- गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाºयांकडून प्रत्येक वेळेला काहीतरी त्रुटी काढून हा आराखडा परत पाठविण्याचे काम सुरू आहे. स्मारक करण्यात अपयशी ठरत असल्याची जबाबदारी स्वीकारून स्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आक्रमक पवित्रा स्मारकाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे बैठक पार पडली. त्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या रखडलेल्या प्रश्नाला गती आली.
बसवेश्वर हे बाराव्या शतकातील समता नायक होते. मंगळवेढा येथे त्यांच्या स्मारकाने त्यांच्या कार्याची उजळणी होणार आहे.
-शैलेश हावनाळे, सदस्य, बसवेश्वर स्मारक समिती़
बसवेश्वर स्मारक मंजूर केल्याबद्दल अध्यक्ष व मुख्यमंत्री यांचे अभिनंदन. हे स्मारक झाल्यानंतर मंगळवेढा हे जागतिक नकाशावर येणार आहे
-विजय बुरकुल, सदस्य, बसवेश्वर स्मारक समिती़
महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक आणि लिंगायत धर्म संस्थापक होते. त्यांचे ११ वर्ष मंगळवेढ्यामध्ये वास्तव्य होते. त्यामुळे मंगळवेढा येथे भव्य स्मारक उभारावे अशी राज्यातील लिंगायत बांधवांची मागणी होती. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयाने स्मारक उभारणीच्या कामाला मूर्त स्वरूप येईल.
-शिवानंद पाटील, झेडपी माजी सभापती आरोग्य व शिक्षण़