दोनशे कोटींच्या उजनी पर्यटन विकास आराखड्याला मंजुरी: जिल्हाधिकारी, अजित पवार यांच्या समोर सादरीकरण
By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 15, 2024 07:16 PM2024-06-15T19:16:23+5:302024-06-15T19:17:45+5:30
या आराखड्यात तत्वत: मंजुरी देण्यात आली असून यासाठी आवश्यक निधीची देखील तरतूद करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी बैठकीत दिली.
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : उजनी धरण परिसर पर्यटन दृष्टीने विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५० ते २०० कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन आराखडा तयार केला असून शनिवारी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यासमोर सादर केला. या आराखड्यात तत्वत: मंजुरी देण्यात आली असून यासाठी आवश्यक निधीची देखील तरतूद करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी बैठकीत दिली.
उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पाविलियन निर्माण करण्यात येणार आहे. यात तिकीट केंद्र व प्रतीक्षलय उभारण्यात येणार आहे. मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, १ हजार क्षमतेचे मोठे सभागृह, बोर्ड रूम, रॉक पूल तसेच भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव, वॉटर फ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रॅम्प, मरिना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाईंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रुझ सफारी, अक्वेटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उजनीच्या सर्वेक्षणास 20 जून पासून सुरुवात होणार आहे. कृषी व विनयार्ड आराखडा 30 जुलै रोजी तयार होईल. प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर एक ते दीड महिन्यात प्रकल्पाला राज्य शिखर समितीची मान्यता मिळेल. त्यानंतर लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.