सांगोल्यासाठी फिरता दवाखाना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:55+5:302021-06-09T04:27:55+5:30
राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला एक असे ३३ फिरते दवाखाने मंजूर केले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मोबाइल मेडिकल ...
राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला एक असे ३३ फिरते दवाखाने मंजूर केले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मोबाइल मेडिकल युनिट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्याला दिले आहेत. याचा लोकार्पण सोहळा खवासपूर (ता. सांगोला) येथे ८ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. याप्रसंगी माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, चंद्रकांत देशमुख, भाऊसाहेब रुपनर, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी सीमा दोडमणी आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर मोबाइल मेडिकल युनिटसाठी डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट व दोन ड्रायव्हर अशी ६ जणांची नेमणूक झाली आहे. या दवाखान्यासोबत डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गाडी सोबत असणार आहे. हा फिरता दवाखाना तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम अशा ५२ वाडीवस्ती व गावांना आरोग्य सेवा देणार असल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.