एप्रिल उजाडला तरी एकाही गावचा टंचाईचा प्रस्ताव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:15+5:302021-04-04T04:22:15+5:30
प्रतिवर्षी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. यामुळे प्रत्येकवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत ...
प्रतिवर्षी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. यामुळे प्रत्येकवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत असत. यंदा एप्रिल महिना उजाडला तरी तालुक्यातील १३१ गावांपैकी अध्याप एकाही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. याचे कारणही तितकेच सत्य आहे. गतवर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला. यामुळे सर्वत्र नदी, नाले तुडुंब भरून वाहिले. बोरी, हरणा, भीमा, सीना या नद्यांना महापूर येऊन गेला. परिणामी विहीर, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे कुठेही पाणीटंचाई भासताना दिसत नाही.
तरीही शासनाने पूर्वतयारी म्हणून तालुक्यातील संभाव्य ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करणे यांचा समावेश आहे.
संभाव्य पाणीटंचाई असणारी गावे
आंदेवाडी बु., बबलाद, परमानंदनगर, भोसगे व तांडा, बिंजगेर, बोरगाव, बोरोटी बु., बोरोटी खु., चिंचोळी मैं., चिंचोळी न., दहिटणे, दहिटणेवाडी, दोड्याळ, गौडगाव बु., हालहळळी (अ.), हंजगी, हसापूर, हत्तीकणबस, इब्राहिमपूर, जकापूर, जेऊर, कलहिप्परगे, कर्जाळ, केगाव बु., केगाव खु., मंगरूळ, मिरजगी, मुगळी, नागनहळ्ळी, नागणसूर, नागोरे, नाविदगी, रामपूर/इटगे, सलगर, समर्थनगर-अंबावाडी, संगोगी (आ.), संगोगी (ब.), शावळ, शिरवळ, शिरवळवाडी, सिन्नूर, दुधनी ग्रा., सुलेरजवळगे, तळेवाड, तोळनूर, वसंतराव नाईकनगर, वागदरी या ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. या निधीमधून विहीर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे करण्यात येतील.
कोट :::::::::::
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे प्रस्ताव येत होते. यंदा एकाही गावचा प्रस्ताव आलेला नाही, तरीही प्रशासनाने संभाव्य म्हणून मागील इतिहासाचे अवलोकन करून टंचाई आराखडा तयार करून ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
- शिवाजी चव्हाण,
उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग