एप्रिलमध्ये शासनाला मिळाला सव्वा कोटीचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:03+5:302021-05-05T04:37:03+5:30
शहरासह १०३ गावे असलेल्या सांगोल्यात दररोज घर जागा (प्लाॅट), शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीचे १२ ते १५ तर कधी २० पर्यंत दस्त ...
शहरासह १०३ गावे असलेल्या सांगोल्यात दररोज घर जागा (प्लाॅट), शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीचे १२ ते १५ तर कधी २० पर्यंत दस्त नोंदणीचे व्यवहार होतात. त्यामुळे सांगोल्यात दुय्यम निबंधक कार्यालय नेहमीच दस्त लेखनिक, पक्षकार, एजंटांमुळे गजबजलेले असते. या कार्यालयांतर्गत मुद्रांक विक्रेते, दस्त लेखनिक, जमीन, घर जागा, प्लॉट, बंगले आदी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील एजंट अशा अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे अत्यावश्यक सेवेतील आस्थापने वगळता सर्व व्यवसाय, उद्योगधंदे बंद आहेत. तर शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी ५० टक्के उपस्थिती दर्शवून कार्यालयीन कामकाज पाहतात. अशा संकटसमयी सांगोल्यातील दुय्यम निबंधक कार्यालयावर कोरोना महामारीचा फारसा फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाविषयक नियमांचे पालन करून एप्रिल महिन्यात या कार्यालयातून सुट्टीचे दिवस वगळून १८ दिवसांत पक्षकारांकडून खरेदी खत, बक्षीसपत्र, गहाणखत, वाटणीपत्र, अदलाबदल, हक्क सोडपत्र, पीक कर्ज अशा ५२६ नोंदणींतून शासनाला तब्बल १ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. पक्षकारांनी एप्रिल महिन्यापूर्वीच खरेदी-विक्रीचे चलन काढून ठेवले होते. त्यामुळे दस्त नोंदणीचे व्यवहार विनाविलंब पार पडल्याचे दुय्यम निबंधक प्रमोद कोकाटे यांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::::
एप्रिल महिन्यात १८ दिवसांत ५२६ दस्त नोंदणींतून १ कोटी ३६ लाख रुपये शासनाला महसूल जमा झाला आहे. मात्र मे महिन्यात पक्षकारांनी खरेदी-विक्री व्यवहाराकडे पाठ फिरवल्यामुळे दस्त नोंदणीचे प्रमाण घटले आहे.
- प्रमोद कोकाटे
दुय्यम निबंधक, सांगोला
फोटो ओळ :::::::::::::::
सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारातील अडगळीतील दुय्यम निबंधक कार्यालय.