अरं देवा; भर चौकात ‘बर्थ डे’चा धिंगाणा; त्रास देणारी तरुणाई जातेय तुरुंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:39 PM2022-04-03T17:39:07+5:302022-04-03T17:39:14+5:30
पोलीस अलर्ट; रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे पडतेय महागात
पंढरपूर : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ वाढली असून, अप्रत्यक्षपणे दहशतच निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून शांतता भंग होऊन इतरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याचे आढळल्यास थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाणार जात आहेत. यासंदर्भात पंढरपूर शहर पोलिसांनी वेळेनुसार कारवाई केल्याने धिंगाणा घालत वाढदिवस साजरी करण्याची पद्धत बंद झाल्याचे पंढरपूर पोलिसांनी सांगितले.
शहरातील गल्लीबोळांत मध्यरात्री आरडाओरड करून डीजेच्या तालावर नाचत वाढदिवस साजरा करण्याची अनेक स्वयंघोषित दादांना हौस असते. अनेक जण तर तलवारीने केक कापून नेतेपणाची हौसही भागवून घेतात. यातून अप्रत्यक्षपणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आता रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडणार आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत असल्याचे आढळून आल्यास बर्थ डे बॉयसह त्यांच्या मित्रांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत.
----------
या ठिकाणी होतात वाढदिवस...
पंढरपूर जुना कराड नाका, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा गांधी चौक, भोसले चौक व कालिका देवी चौक या ठिकाणी रस्त्यावरच वाढदिवस साजरे केले जातात.
तीन गुन्हे दाखल...
डीजे लावून, मोठ्या प्रमाणात आवाज सोडून एकत्र येऊन वाढदिवस केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील प्रत्येक प्रकरणात किमान १० ते १५ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------
रोज होते पेट्रोलिंग...
पोलिसांकडून रोज पेट्रोलिंग होत असल्याने रस्त्यावर डीजे व डॉल्बी लावून वाढदिवस साजरा करण्याला आळा बसत असल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर शहर पाेलीस दलाच्या विविध पथकांकडून रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग, गस्त घालण्यात येते. संशयित तरुण रस्त्यावर दिसल्यास त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करून सोडून दिले जाते.
-------------
कोरोना कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरे होत असल्याची माहिती मिळताच तत्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे मागील काही महिन्यांपासून रस्त्यावर वाढदिवस साजरे करण्याच्या घटना घडल्या नाहीत.
- अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे