इकडून-तिकडून बिबट्या येतोय का काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:41+5:302020-12-09T04:17:41+5:30

करमाळा : गेल्या आठ दिवसांपासून करमाळा तालुक्यात अनेक गावांत कुठे ना कुठे बिबट्यांचे दर्शन होत आहे. सहा दिवसांत ...

Are leopards coming here and there? | इकडून-तिकडून बिबट्या येतोय का काय?

इकडून-तिकडून बिबट्या येतोय का काय?

Next

करमाळा : गेल्या आठ दिवसांपासून करमाळा तालुक्यात अनेक गावांत कुठे ना कुठे बिबट्यांचे दर्शन होत आहे. सहा दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांनी हल्ले करून तीन जणांना ठार केल्याने शेतकरी व मजूरवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाण्यास कोणी धजावत नाही. उभ्या पिकांना पाणी देताना एकटे न जाता साथीदाराबरोबर, हातात काठ्या घेऊन जाणे, मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे व पातेले, थाळ्या वाजवणे तसेच मोबाइलवर जोरजोरात गाणे वाजवणे अशा उपाययोजना शेतकरी करत आहे.

करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे बिबट्यांनी हल्ले करून तिघांना ठार केल्याची घटना घडली आहे, तर दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत आहे. गाय, वासरू, रेडकू, कुत्रे अशा पाळीव प्राण्यांवरही हल्ले होऊ लागल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सरलेल्या मान्सूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने तूर पीक जोमात आहे, तर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसतोडही सुरू आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकास पाणी देणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना शेतात दिवसरात्र जावेच लागत आहे; मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे मनात धडकी भरत आहे.

----

काय म्हणतात शेतकरी..?

शेतात तूर काढणीला आली आहे व ज्वारीचे भरणे करावयाचे आहे, मात्र बिबट्यामुळे मनात भीती बसली आहे. बिबट्याने तीन माणसांचा जीव घेतल्याने शेतीत जाणे धोक्याचे बनले आहे, असे देवळाली येथील शेतकरी संजय चव्हाण यांनी सांगितले.

दिवसा वीजपुरवठा नसतो. रात्री असतो, परंतु बिबट्यामुळे रात्री पिकांना पाणी देणे धोकादायक बनले आहे. वीज मंडळाने रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी म्हणजे उजेडात पिकांना पाणी देता येईल, अशी अपेक्षा पोटेगावचे शेतकरी विजय जगदाळे यांनी व्यक्त केली. बिबट्याच्या भीतीने गहू, हरभरा पेरण्या खोळंबल्या आहेत. बिबट्याच्या भीतीने मजूर शेतात येत नाही. आठ दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी नुसते फिरते आहे; पण बिबट्या हाती लागत नाही, अशी खंत हिवरवाडी येथील संजय खोमणे यांनी व्यक्त केली.

फोटो ओळी: ०८करमाळा-बिबट्या०२

करमाळा तालुक्यातील हिवरवाडी शिवारात पाइपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी युवा शेेतकरी काठी घेऊन बिबट्यापासून संरक्षण करीत आहे.

Web Title: Are leopards coming here and there?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.