केळीचं क्षेत्र वाढलं जोरात, मात्र संशोधन केंद्र, शीतगृह सक्षम वाहतूक व्यवस्थाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:22 AM2021-03-26T04:22:05+5:302021-03-26T04:22:05+5:30
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात उजनीचे पाणलोट क्षेत्र लाभल्यामुळे बागायती २९ गावांच्या शिवारात ऊस आणि केळी हीच दोन पिके मोठ्या ...
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात उजनीचे पाणलोट क्षेत्र लाभल्यामुळे बागायती २९ गावांच्या शिवारात ऊस आणि केळी हीच दोन पिके मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. येथील हवामान केळीला पोषक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ऊस उत्पादकही केळी लागवडीलाच प्राधान्य देऊ लागले आहेत. उत्पादन आणि गुणवत्तेमुळे जागतिक बाजारपेठेत चांगला उठाव आहे.
शेती ते बाजारपेठ अशाप्रकारे केळी पाठविली जात असल्याने आर्थिक उत्पन्नही चांगले मिळत असले तरी हीच विकासाची गती कायम राखण्यासाठी केळी उत्पादकांना कृषी प्रशासनाकडून सातत्याने पाठबळ मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. केळीची सध्याची दिशा चांगली आहे; परंतु भविष्यात उसासारखी दशा होऊ नये. याबाबत आतापासूनच दूरदृष्टी ठेवून काळजी घेतली जाणे आवश्यक आहे.
-----
केळीची झपाट्याने वाढत चाललेली लागवड व उत्पादकांची सकारात्मकता लक्षात घेऊन करमाळा तालुक्यात केळी संशोधन व विकास केंद्र उभारले पाहिजे. केळी लागवडीसाठी उत्पादकांना मार्गदर्शन मिळणार आहे.
- नवनाथ भांगे, कंदर
----
अवकाळी वातावरणामुळे होणारे नुकसान, बाजारभावाची अनिश्चितता, व्यापाऱ्याकडून दिला जाणारा कमी दर, उत्पादित मालाचे वितरण करताना होणारे नुकसान या केळी उत्पादकांच्या प्रमुख अडचणी आहेत. त्यावर उपाय शोधला पाहिजे.
- राजेंद्र बारकुंड, चिखलठाण.
----
या समस्यांकडे लक्ष द्या!
उजनीतील पाणी येथील शेतीसाठी राखीव असावे, पुरेशा दाबाने वीज मिळावी, केळीला हमीभाव जाहीर व्हावा, पीकविमा रकमेत वाढ व्हावी, व्यापारी वर्गाकडून आर्थिक पिळवणूक होऊ नये, केळी निर्यात करण्यासाठी किसान रेल्वे वाहतूक फायदेशीर ठरते. त्यादृष्टीने वातानुकूलित रेल्वे डब्याची सोय व्हावी, अशी अपेक्षा वाशिंबेचे उत्पादक सुयोग झोळ यांनी व्यक्त केली.
------
केळी पिकविणे व साठवणूक यासाठी शीतगृहाची उभारणी व्हावी, बाजार समितीने केळी लिलावाची अडत बाजारात सोय, वाहतूक व्यवस्था करावी.
- धुळाभाऊ कोकरे, कुगाव