सिध्देश्वर यात्रेसाठी सोलापूर महापालिका परिवहन विभागाच्या १६ विशेष बसेसची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:21 PM2018-01-11T12:21:29+5:302018-01-11T12:24:04+5:30
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी मनपा परिवहन खात्याने विशेष बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी १६ जादा बसगाड्यांची उपलब्धता केली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी मनपा परिवहन खात्याने विशेष बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी १६ जादा बसगाड्यांची उपलब्धता केली आहे.
प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी गेले चार दिवस नियोजन करून बंद पडलेल्या १० बस दुरुस्त करून यात्रेसाठी मार्गावर आणण्याची तयारी केली आहे. परिवहनच्या ताफ्यात सध्या दररोज मार्गावर ४५ बसगाड्या धावत आहेत. यात्रेसाठी विशेष सेवा देण्यासाठी किरकोळ कारणावरून बंद पडलेल्या गाड्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. हद्दवाढ भागातून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधीसाठी येणाºया भाविकांसाठी विशेष सेवा देण्यासाठी १३ ते ३१ जानेवारी या काळात वोरोनोको प्रशालेजवळ मंडप मारून विशेष बसशेड उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर विडी घरकूल व नीलमनगर भागातून येणाºया भाविकांसाठी इदगाह मैदानावर बसशेड सुरू करण्यात येणार आहे.
सैफुल आणि सिद्धेश्वर साखर कारखाना मार्गावर प्रत्येकी पाच बसगाड्यांद्वारे शटल सेवा देण्यात येणार आहे. या गाड्या वोरोनोको शाळेच्या बसशेडवरून सुटतील. यात्रा स्पेशल गाड्या मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरात धावण्यासाठी दोन शिफ्टमध्ये ड्युटी लावली आहे.
-----------------------
पोलिसांबरोबर आज बैठक
- रंगभवन ते डफरीन या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने फक्त यात्रेसाठी भाविकांना हा रस्ता खुला करण्यात आला आहे. रंगभवन चौकातून चालत भाविकांना मंदिराकडे यावे लागेल. त्यामुळे वोरोनोको बसशेडकडे येणाºयांसाठी डफरीनच्या मार्गाचा बसना वापर करावा लागणार आहे. याबाबत वाहतूक शाखेच्या कार्यालयात गुरुवारी पो. नि. काणे व आरटीओ निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. यात बस मार्गाचे नियोजन करण्यात येणार आहे.