माघी यात्रेकरिता १६२ CCTV सह १३९४ पोलिसांचा बंदोबस्त
By दिपक दुपारगुडे | Published: February 18, 2024 06:39 PM2024-02-18T18:39:49+5:302024-02-18T18:40:08+5:30
माघी यात्रे निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
सोलापूर: माघी यात्रे निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. २० फेब्रुवारी रोजी जया एकदशी असून, माघी यात्रा कालावधी २६ फेब्रुवारी पर्यंत आहे. या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी १६२ सीसीटिव्हीसह १३९४ पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जून भोसले यांनी दिली.
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, ६५ एकर, महाव्दार चौक, महाव्दार घाट, पत्राशेड व नामदेव पायरी या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रासह, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, स्टेशन रोड आदी ठिकाणी १६२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशापांडे यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे . तसेच वाहतुक नियमनासाठी डायव्हरशन पॉईट व नाकाबंदी पाँईंट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात तसेच शहराबाहेर वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांनी व नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.भोसले यांनी केले आहे.