रांगेत उभा राहणाºया मतदारांना बसण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:19 PM2019-04-04T14:19:31+5:302019-04-04T14:21:32+5:30
मतदान केंद्रावर सुविधा; निवडणूक केंद्रांवर प्रथमच दिसणार ‘मदतनीस केंद्र’ फलक
अरुण बारसकर
सोलापूर : दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व मतदान केंद्रापर्यंत मदतीला शालेय विद्यार्थी..कर्मचारी व मतदार राजासाठी पिण्याचे शुद्ध पाणी..मतदारांना रांगेत उभा राहण्याची वेळ आली तर डेस्क किंवा बसण्याची सोय.. तर कडेवर मुले घेऊन येणाºया महिलांच्या मदतीला अंगणवाडी किंवा आशाताई़ या केल्या जाणार आहेत मतदान केंद्रांवर सुविधा. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रालगतच्या एका खोलीला ‘मदतनीस केंद्र’(हेल्प डेस्क) चा फलक व त्यात या सुविधा प्रथमच पुरविल्या जाणार आहेत.
जानेवारीपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासन पातळीवर सुरू आहे. मतदार याद्यांपासून मतदान करुन घेण्याचे प्रशिक्षण हे काही नवे नाही, मात्र मतदान केंद्रांवरील सुविधांबाबतच्या सूचना या नवीन आहेत. मतदान केंद्रांवरील कर्मचारी व मतदारांसाठी सुविधा देण्याबाबतच्या मिळालेल्या सूचनेनुसार सहायक निवडणूक अधिकाºयांनी शहरात बुथस्तरावर तर ग्रामीण भागात तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाºयांपासून मतदार राजाचीही काळजी घेतल्याचे यावरुन दिसत आहे.
दिव्यांग व्यक्तीला मतदान करण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करण्यासाठी सामाजिक संस्था किंवा शासनाने दिलेल्या तीनचाकी सायकलीचा वापर केला जाणार आहे. याला कोणतेही मूल्य दिले जाणार नाही, मात्र मोफत सायकल उपलब्ध झाली नाही तर भाडेतत्वावर घेण्याच्या सूचना तलाठ्याला दिल्या आहेत. दिव्यांग मतदाराला मतदानासाठी मदत करण्यासाठी शालेय (शक्यतो एन.सी.सी.) विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. माध्यमिक शाळेच्या मुलांची नावे अगोदरच तलाठ्यांनी कळवायची आहेत. या मुलांनी स्वयंसेवक म्हणून काम करावयाचे असून, त्यांना केवळ फूड पाकीट दिले जाणार आहे.
तीन-चार मतदान केंद्रे असलेल्या इमारतीत एक खोली मदतनीस केंद्र(हेल्प डेस्क) केले जाणार आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, रांगेत उभा राहावे लागत असेल तर बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांनी जारवाल्यांचे संपर्क नंबर घेतले आहेत. महिला मतदारांच्या कडेवर मुल असेल तर अशा मुलांसाठी तात्पुरते पाळणाघर तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा आशाताईची नियुक्ती केली जाणार आहे. या ताईला मानधन दिले जाणार आहे.
जेवणाची काळजीही घेतली जातेय
आजवर ग्रामीण भागात तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जेवणाची व्यवस्था केली जात असे. परंतु या निवडणुकीसाठी कर्मचाºयांच्या जेवणाची काळजी घेण्यात आली आहे. निवडणूक कर्मचाºयांना विशेष भत्ता दिला जातो. त्यातूनच हा खर्च भागवायचा असून, त्यासाठी ग्रामीण भागात महिला बचत गटांवर जबाबदारी सोपवली आहे. शहरी भागात मतदान केंद्राच्या जवळच्या दोन खानावळीचे संपर्क क्रमांक घेण्यात आले असून, त्या ठिकाणाहून जेवण मागविण्याच्या सूचना दिल्या आहेत.