शिक्षिकेवर २९ वर्षे अत्याचार; सपाटेंच्या अटकेसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
By Appasaheb.patil | Published: September 22, 2022 02:16 PM2022-09-22T14:16:19+5:302022-09-22T15:25:22+5:30
जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दिले निवेदन
सोलापूर : मराठा समाज सेवा मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी हायस्कूल, सोलापूर येथील शिक्षकेवर १५ ऑगस्ट १९९३ ते २८ जून २०२२ या कालावधीत छत्रपती शिवाजी शाळा, शिवपार्वती लॉज व वसंत विहार येथील पत्राशेडमध्ये अत्याचार झाल्याची लेखी तक्रार एका पीडित शिक्षिकेने १९ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस उपयुक्त यांच्याकडे केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जिथे शिक्षणासारखे पवित्र कार्य चालते अशा पवित्र ठिकाणी मनोहर सपाटे यांच्यासारखे संस्था अध्यक्ष पदाचा धाक दाखवून जर असे वागत असतील तर त्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. तसेच इतरांवरही अन्याय-अत्याचार झाल्याची विश्वसनीय माहिती मिळालेली आहे. त्यामुळे मराठा समाज सेवा मंडळ या संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांची चौकशी करून सपाटेवर गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.
मराठा समाजात शैक्षणिक प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने कै. ॲड. ए. तु. माने, ब्रम्हदेव माने, निर्मलाताई ठोकळ, शंकरराव कोल्हे, जगन्नाथ भोईटे यासह सोलापूरच्या मराठा समाजातील लोकांनी वर्गणी काढून स्थापन केलेल्या या संस्थेच्या शाळेतच मराठा शिक्षिकेवर अन्याय-अत्याचार झालेला आहे. याबाबत सर्वसामान्य मराठ्यांच्या तीव्र भावना असून व संस्थाध्यक्ष सपाटे यांचेविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मनोहर सपाटेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून संबधित संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून निपक्ष तपास करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर दास शेळके, नानासाहेब काळे, दिलीपभाऊ कोल्हे, सुनिल रसाळे, शशि थोरात, प्रताप चव्हाण, तुकाराम मस्के, बजरंग आवताडे, शेखर फंड, सोमेश पवार, उत्तम खुटे, रामचंद्र कदम, डी. एन. जाधव, जयवंत सुरवसे, विजय पोखरकर आदींनी सह्या केल्या आहेत.