घर मालकीणचे दागिने पळविणार्या महिलेला अटक
By admin | Published: May 20, 2014 12:52 AM2014-05-20T00:52:50+5:302014-05-20T00:52:50+5:30
औसे वस्तीतील चोरीचा छडा : १ लाख ८३ हजारांचे दागिने हस्तगत
सोलापूर : औसे वस्तीमधून भरदुपारी कपाटातून लाखो रुपयांचे दागिने पळविणारी महिला कांचन संतोष व्हनमाने (वय २३, रा़ कडबे गल्ली, पेट्रोल पंपाच्या मागे, पंढरपूर) हिला फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी अटक केली असून तिच्याकडून १ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत़ तिला न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकार्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली़ आमराई, औसे वस्तीत राहणार्या सुवर्णा राजाराम खरात (वय ३५) यांच्या घरातून १० मे रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत कांचन हिने उघड्या कपाटातील लॉकर्समधून हातातील पाटल्या, मणिमंगळसूत्रासह १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचे दागिने पळविले होते़ काही दिवसांपूर्वी कांचन ही सुवर्णा खरात यांच्या घरी भाडेकरु म्हणून राहायला आली होती़ दागिने चोरीचा प्रकार उघडकीस येताच सुवर्णा खरात फौजदार चावडी गाठून फिर्याद नोंदवली होती़ पो. नि. सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एस़ के़ खटाणे, युवराज पवार, दादासाहेब सरवदे यांचे पथक नेमले़ या पथकाने १६ मे रोजी तिला पुण्यातून ताब्यात घेतले़ तिच्याकडे चौकशी केली असता मोहोळमधील मावशीकडे दडविलेले दागिने तिने काढून दिले़ तपास हेडकॉन्स्टेबल माने करीत आहेत़