लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन रोकड चोरणाऱ्या महिलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:06+5:302021-07-08T04:16:06+5:30
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील शेळीचा व्यापार करणारे मुस्ताक धारुल हे ३ रोजी पिकअप (एम ...
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील शेळीचा व्यापार करणारे मुस्ताक धारुल हे ३ रोजी पिकअप (एम एच १३ ए एक्स ९०१४) मधून चालक सुलतान रमजान तांबोळीसह शेळ्या खरेदी करण्यासाठी करमाळ्याला निघाले होते. दरम्यान, कोन्हेरी पाटीजवळ रस्त्यावर उभे असलेल्या महिलांनी चालकाला लिफ्ट देण्यासाठी हात केला. गाडी उभी करून विचारणा केली असता, आम्हाला मोडनिंबला जायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी दरवाजा उघडून दोन महिला पिकअपच्या पुढील बाजूस बसल्या व एक महिला खालीच उभी राहिली होती. चालकाने त्या महिलेस पाठीमागे बसण्यास सांगितले.
दरम्यान, पिकअपमधील त्या महिला खाली उतरल्या व आम्हाला यायचे नाही, असे सांगितले. त्यामुळे चालकाने पिकअप पुढे नेली. काही अंतर पुढे गेल्यानंतर पिकअपमधील ठेवलेले पैसे आहेत का, हे पाहण्यासाठी ड्रॉव्हर उघडले असता पैशांची कॅरीबॅग गायब होती. आपली फसवणूक व चोरी झाल्याचे लक्षात आल्याने मुस्ताक धारूल यांनी अज्ञात तीन महिलांनी पिकअपमधील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ३ लाख २० हजार रुपये चोरून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलिसांत दिली होती. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी खापरे हे करत आहेत.
----
दोन महिलांना कोर्टीत पकडले
सोलापूर पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाने तत्काळ सूत्रे फिरवत या तीन महिलांचा माग काढीत कोर्टी (ता. करमाळा) येथील बसस्थानकामध्ये दोन महिलांना पकडले. यामध्ये शायनाई काळे व पद्मिनी काळे (रा. कोर्टी ता. करमाळा) यांना मंगळवारी ताब्यात घेऊन यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये जप्त केले. त्यांनी गुन्ह्यांची कबुलीही दिली. दोन महिलांना न्यायालयासमोर उभे केले असता ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.