गाजावाजा न करता दबक्या आवाजात बाप्पाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:23 AM2021-09-11T04:23:43+5:302021-09-11T04:23:43+5:30
श्री गणेश आगमनानिमित्त कोठेही ढोल-ताशा न वाजवता, डामडौल न करता नागरिकांनी दुचाकी, चारचाकीवरून लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाताना चित्र ...
श्री गणेश आगमनानिमित्त कोठेही ढोल-ताशा न वाजवता, डामडौल न करता नागरिकांनी दुचाकी, चारचाकीवरून लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाताना चित्र पाहावयास मिळाले. ज्या मंडळांना प्रतिष्ठापना करायची आहे त्यांनी सार्वजनिक जागेत न करता, वैयक्तिक जागेत कोरोना नियमांचे पालन करून ४ फुटांपर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले होते. या अनुषंगाने गणेश मंडळांनी कोणताही गाजावाजा न करता गणरायाची प्रतिष्ठापना केली.
सांगोला शहरातील जय भवानी चौक, शिवाजी चौक, धान्य बाजार पटांगण, नेहरू चौक, स्टेशन रोड, नगरपालिका परिसर, महात्मा फुले भाजी मंडई, कचेरी रोडसह उपनगरातील स्टॉलवर गणरायाच्या मूर्तीसह प्रतिष्ठापनेसाठी लागणारे हार फुले, वस्त्र माळ, दूर्वा, पेढे, मोदक, खुंची, फेटे, विविध रंगातील रांगोळ्या, गुलाल, चिरमुरे, सजावटीचे साहित्यासह पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पोलीस कर्मचाऱ्यास होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.