आयपीएल खेळणारा आर्शिन कुलकर्णी सोलापूरचा पहिला खेळाडू
By Appasaheb.patil | Published: December 19, 2023 06:44 PM2023-12-19T18:44:58+5:302023-12-19T18:45:41+5:30
लखनऊ सुपर जायन्ट्स संघात दिसणार.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूरचा क्रिकेटपटू आर्शीन कुलकर्णी हा आता आयपीएल मध्ये खेळताना दिसणार आहे. मंगळवारी झालेल्या आयपीएल लिलावामध्ये अर्शिन कुलकर्णीला वीस लाखांमध्ये लखनऊ सुपर जायन्ट्स या टीमने विकत घेतले आहे. अर्शीन कुलकर्णी याने यापूर्वीच भारताच्या अंडर १९ क्रिकेट संघात आपले स्थान मिळवले आहे.
अर्शिनने अंडर-१९ आशिया कप २०२३ च्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताकडून अष्टपैलू आर्शिन कुलकर्णीने चमकदार कामगिरी केली. त्याने ७० धावांची नाबाद खेळी करत ३ बळी घेतले. याशिवाय मागील वर्षी विनू मांकड ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठीच्या वरिष्ठ महाराष्ट्र संघात निवड झाली. विनू मांकड करंडक बाद फेरीत निवड होण्यापूर्वी त्याने अंतिम फेरीत शतक झळकावले. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही १३ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. या यशस्वी कामगिरीच्या जोरावर सोलापूरचा आर्शिनचा आयपीएलच्या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात, आजी-आजोबा यांची मिळालेली मुलाची साथ, सोलापुरातल्या मैदानावरून सुरू केलेला प्रवास आता १९ वर्षांखालील भारतीय टीममध्ये खेळण्याची संधी इथपर्यंत आला आहे. सोलापूरचा आर्शिन कुलकर्णी हा भविष्यातील हार्दिक पांड्या किंवा जॅक कॅलीस होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत तो पुढे जात असल्याचे क्रिकेट् प्रेमींनी सांगितले.