चिमणीचा भोंगा.. पोपटाचा पंगा!

By सचिन जवळकोटे | Published: October 4, 2018 12:03 AM2018-10-04T00:03:46+5:302018-10-04T00:04:37+5:30

चिमणी वाचविणे, हाच ‘आपला धर्म’ असं म्हणे आजकाल सुभाषबापूंना वाटू लागलंय. आता यात मनापासून चिमणीची चिंता आहे की विजय मालकांच्या विरोधातल्या नव्या युद्धाचा भोंगा आहे,

article on solapur politics, Chimanicha Bhonga .. papataca panga!, | चिमणीचा भोंगा.. पोपटाचा पंगा!

चिमणीचा भोंगा.. पोपटाचा पंगा!

चिमणी वाचविणे, हाच ‘आपला धर्म’ असं म्हणे आजकाल सुभाषबापूंना वाटू लागलंय. आता यात मनापासून चिमणीची चिंता आहे की विजय मालकांच्या विरोधातल्या नव्या युद्धाचा भोंगा आहे, हे फक्त ‘शहाजी-अवी’ जोडीलाच माहीत... एकीकडे सोलापुरात ‘चिमणीचा भोंगा’ जोरजोरात वाजत असताना दुसरीकडे मोहोळमध्ये ‘पोपटाचा पंगा’ प्रकरण भलतंच रंगू लागलंय. अनगरच्या मालकांना वाढप्याच्या रांगेत नेऊन बसविणा-या लक्ष्मणरावांना विरोधकांनी पुन्हा एकदा पोपटाची उपमा दिलीय. मात्र जगाला कुठं माहिताय की, कदमांची भेट घेऊन कारागृहात अजून एक खोली साफसफाई करून ठेवायला ‘वाघोली’करांनी सांगितलंय.

दोन देशमुख.. एक चिमणी!

नुकत्याच झालेल्या ‘सिद्धेश्वर’च्या सभेत कट्टर विरोधक अब्‍दुलपूरकरांच्या तम्मा यांनी चक्क हात जोडून सभासदांना विनंती केली की, 'गोंधळ घालू नका. कारखान्याच्या अध्यक्षांना बोलू द्या होऽऽ’ आता गेल्या तीन दशकांपासून सभासदांनाही माहितंय की कारखान्याचे अध्यक्ष कधी बोलतच नाहीत. कोणत्याही वादापासून दूर राहण्याच्या स्वभावामुळे ते आजपर्यंत अजातशत्रू राहिले, हा त्यांचा ‘प्लस पॉर्इंट’ की गरज असतानाही वेळप्रसंगी तोंड न उघडल्यामुळे कसब्यातल्या मंडळींना अपेक्षित असणा-या आक्रमक नेतृत्वाला सोलापूरकर मुकले, हा त्यांचा ‘मायनस पॉर्इंट'... हे ‘गंगा निवास’लाच ठाऊक. असो.
‘सुभाषबापू अन् धर्मराज’ यांची जवळीक अनेकांना खटकू लागलीय. परवाच्या सभेत म्हेत्रे, शिवदारे, माने, शेळके, हसापुरे ही मंडळी दिसली नाहीत, हा नक्कीच योगायोग नसावा. अशातच ‘चिमणी म्हणजे कारखान्याचं शिखर’ असं सांगून अध्यक्षांनी त्याला पूर्णपणे इमोशनल टच दिलाय. या पार्श्वभूमीवर सर्वाधिक गोची कुणाची झाली असेल तर अधिका-यांची. त्यांचा मोबाईल वाजला तर म्हणे पटकन् उचलून सांगू लागतात, ‘होय देशमुखसाहेबऽऽ तुम्ही सांगितल्याप्रमाणं आम्ही लवकरात लवकर चिमणी पाडून टाकतो; तेव्हा तिकडचा आवाज म्हणतो, ‘मी देशमुखच बोलतोय... पण मालक नव्हे, बापू. ती चिमणी आहे तशी राहू द्या.. नंतर बघू? आता बोला मंडळीऽऽ त्या बिच्चा-या अधिका-यांनी करावं तरी काय?

मोहोळच्या नेत्यासाठी
म्हणे अजून एक खोली!

मोहोळच्या लक्ष्मणरावांनी अनगरकरांना चिमटे काढल्यानंतर त्यांच्या चेल्यांना थोडंच आवडणार? त्यांनी लक्ष्मणरावांची ‘पोपटपंची’ बाहेर काढली... पण खरंतर पोपटाची अन् लक्ष्मणरावांची तुलनाच होऊ शकत नाही.
१) पोपट फक्त गोड-गोड बोलतो. समोरच्याचं मनोरंजन करतो. लक्ष्मणराव मात्र गोड शब्दांमधून बारीक चिमटे काढतात.
२) पोपटाचं समाधान एखाद्या छोट्याशा पेरूमुळेही होतं. लक्ष्मणरावांची राजकीय भूक मात्र प्रचंड.
३) पोपटाचं जग इवल्याशा पिंज-यापुरतंच. लक्ष्मणरावांच्या कर्तृत्वाची लक्ष्मणरेषा मात्र अथांग. अक्कलकोटातून मंगळवेढा करत ते मोहोळमध्ये पोहोचलेत. पुढच्या वर्षी कदाचित माळशिरसमध्येही चक्कर मारून येतील. 
४) मालकाच्या इशा-यानुसार पोपट दुसºयाचं भविष्य सांगत असतो. लक्ष्मणरावांना मात्र कधी स्वत:चंच भविष्य जाणता आलं नाही. त्यामुळंच अनेक पक्षांची ट्रीप करूनही एका ठिकाणी नीट स्थिर होता आलं नाही.
...अजून एक ब्रेकिंग न्यूज. लक्ष्मणरावांना म्हणे मध्यंतरी महामंडळाच्या माजी कारभाºयाचा फोन आलेला. जामिनाच्या तारखेसाठी बाहेर आल्यानंतर दोघांची शिवडीत भेटही झालेली. ‘माझी चूक झाली. यापुढे मी तुमच्या राजकारणाआड येणार नाही. मला फक्त या प्रकरणातून बाहेर काढा,’ असं एकेक कदम आस्ते टाकत म्हणे विनवणी केली गेलेली. 
तेव्हा गुरूनंही लगेच आपली पॉलिसी बदलली. ज्याला आत टाकलं, त्यालाच बाहेर काढण्यासाठी ‘वर्षा’पर्यंत जाण्याचा मार्गही दाखविला. विशेष म्हणजे, आतमध्ये अजून एक खोली साफसफाई करून ठेवायला सांगितली. अख्ख्या फॅमिलीचा हिशेब घालताना आकडेमोड करत. बापरेऽऽ ही अंदर की बात मालकांपर्यंत कुणीतरी पोहोचवायलाच हवी... कारण ‘पोपटाचा पंगा’ लई डेंजर... वाटल्यास रमेशदादांना विचारा.

नावातच ‘बंड’... संजयमामा थंड!

ज्यांच्या नावातच ‘बंड’ आहे, त्या शिवाजीरावांनी करमाळ्याच्या पाटलांना हिसका दावलाच. जयवंतरावही म्हणे या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. मात्र, 'बाजार समिती'त खुर्चीचा 'लिलाव' मांडणा-या बागल गटानं आनंदाच्या जल्लोषात हेही विसरू नये की, शिवाजीराव कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहतीलच. कदाचित, हे ओळखण्याइतपत रश्मीताई अनुभवी अन् चाणाक्ष नक्की; पण त्यांच्या लाडक्या बंधुराजांचं काय? 
एकेकाळी करमाळ्यातली झुंडशाही मोडून काढून दिगामामांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं. अवघ्या तालुक्यात नावाचा दबदबा बसविलेला. मात्र आज त्यांच्याच वारसदाराला कपडे फाटेपर्यंत मारलं जातं... किती हे दुर्दैव? या प्रकरणात हल्लेखोरांचा मस्तवालपणा लोकशाहीसाठी जेवढा घातक तेवढाच वारसदारांचा आततायीपणाही धोकादायक.. हे रश्मीतार्इंनी ओळखायला हवं. भाग्यानं वडीलधा-यांचा राजकीय वारसा मिळू शकतो, पण ते टिकविण्यासाठी जिभेवर साखर अन् डोक्यावर बर्फही लागतो, हे ‘प्रिन्स’ला सांगण्याची वेळ आलीय, अशी करमाळकरांमध्ये कुजबुज.. कारण ‘उचलली जीभ, लावली टाळूला,’ हे राजकीय परिपक्वतेचं लक्षण नाही. व्हय की नाय प्रिन्ससाहेब?
जाता-जाता : करमाळ्याचं राजकारण भल्या-भल्यांना हँडल करता आलं नाही, हे गेल्या आठवड्यातल्या ‘लगाव बत्ती’ मध्ये आम्ही पामरानं स्पष्ट केलं होतं. त्याचीच प्रचिती आज संजयमामांना आलीय. गेले आठ-दहा दिवस बाजार समितीची चावी म्हणे उशाखाली ठेवूनच संजयमामा विश्रांती घेत होते. पण कुठलं काय... बागल गटानं कुलूपच पळवलं. तेल गेले, तूप गेले, बंडगरही गेले... हाती बिनकामाच्या चावीचे की-चेन आले !

दिलीपरावांची श्रीमंती...रौतांचं औदार्य!

महाराष्ट्रातल्या सर्वाधिक श्रीमंत आमदारांमध्ये बार्शीच्या दिलीपरावांचं नाव येताच सर्वप्रथम गडबडले म्हणे त्यांचेच काही कार्यकर्ते. ‘आम्हाला कधी दिसली नाही बुवाऽऽ आमच्या नेत्याची श्रीमंती!’ असं म्हणे काही जण हळूच खुसपुसले. कदाचित नगरपालिका अन् बाजार समिती निवडणुकीत तसा अनुभव आला असावा.
दिलीपरावांच्या श्रीमंतीमागं त्यांची वकिली अन् शेती हे कारण सांगितलं जात असलं तरी सुधीरभाऊंची काटकसर हेही महत्त्वाचं कारण बरं का. बाजार समितीतले व्यापारी खाजगीत काहीही बोलत असले तरी अडीअडचणीला मदतीला धावून येणा-या नेत्यांची गरज असतेच. विशेष म्हणजे, नेहमी आपल्या कर्जबाजारीपणाचं मार्केटिंग करणा-या रौतांनी गेल्या दोन्ही निवडणुकीत शेवटच्या क्षणी जसं ‘औदार्य’ दाखविलं, ते पाहता पुढच्या आमदारकीला सुधीरभाऊंना दिलदार व्हावंच लागणार.

Web Title: article on solapur politics, Chimanicha Bhonga .. papataca panga!,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.