मराठवाड्यातील कारागीर सोलापुरात; तांबे, पितळ अन् जर्मनच्या भांड्यातून साकारतोय देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 12:01 PM2021-10-01T12:01:40+5:302021-10-01T12:01:50+5:30
मराठवाड्यातील बीड, परभणी येथून आठ ते दहा कुटुंबं सध्या सोलापुरात मुक्कामी आहेत.
सोलापूर : घरातील किचनमध्ये सध्या स्टील, इंडालीयम, नॉन स्टिक सारख्या आधुनिक भांड्यांचा सर्रास वापर करण्यात येत आहे. आरोग्यपूरक असलेली तांबे, पितळची भांडी विवाह सोहळ्यातील रुखवतात ठेवण्यात एवढेच सीमित झाले आहे, याच भांड्यातून देव साकारतात हे ऐकल्यावर मात्र आश्चर्य वाटेल. पण, हे सत्य असून अशा जुन्या रिटायर्ड झालेल्या भांड्यावर प्रक्रिया करून ओतकामातून देव साकारणारे कारागीर शहरात दाखल झाले आहेत.
जुनी, पुराणी तांबा पितळ, जर्मनची भांडी घेऊन या ....आपल्या श्रद्धेचा देव बनवून घेऊन जा ..असे ओरडत वेगवेगळ्या वस्तीत फिरणारे हे कारागीर. दहा-बारा ग्राहक गोळा झाले की त्यांची भट्टी त्याच ठिकाणी पेटते. आणलेल्या भांड्यातून कोणत्या देवाची मूर्ती हवी आहे त्याचे आकारमान आणि साइजप्रमाणे दर ठरतो. कोळश्याच्या निखाऱ्यावर तप्त झालेल्या भांड्यात विशिष्ट रसायन टाकून भांडी वितळवण्यात येतात, त्यात भांड्याचे रुपांतर लालबुंद रसायनात झाल्यावर ते देवाच्या मूर्तीच्या साच्यात ओतले जाते. जवळपास पाऊण तासाच्या प्रकियेनंतर भक्तांना त्यांची श्रद्धा असलेल्या देवाची मूर्ती आकाराला येते.
मराठवाड्यातील बीड, परभणी येथून आठ ते दहा कुटुंबं सध्या सोलापुरात मुक्कामी आहेत. सोमवारी शहरातील मार्कंडेय रुग्णालय परिसरात नबी शेख आणि नमाज शेख हे कारागीर कुटुंबीयासह भट्टी लावून भांड्यातून देव साकारताना आढळून आले. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करत आहेत. सोलापूर शहरातून त्यांच्या कलेला चांगली दाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. एका मूर्तीसाठी साठ ते शंभर रुपये मजुरी मिळते, कुटुंबातील महिला शेगडी पेटविण्यापासून तयार झालेल्या मूर्ती परिसरातील नागरिकांना दाखवून भांडी घेऊन येण्यास सांगण्याचे काम करतात. एका वस्तीतून दुसऱ्या ठिकाणी असे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत यांची भटकंती सुरू असते.
-------
चाळीस प्रकारच्या देव-देवतांच्या मूर्ती होतात तयार...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीसह सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांसह जवळपास चाळीस देव-देवतांच्या मूर्ती हे कारागीर बनवितात. यामध्ये शंकर-पार्वती, गणपती, महालक्ष्मी, स्वामी समर्थ, गुरुदेवदत्त, साईबाबा, तिरुपती बालाजी, नृसिंह खंडोबासह तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, शिवाजी महाराज अशा संतांसह जवळपास चाळीस प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्ती भक्तांच्या पसंतीनुसार करून देतात.