सोलापूरच्या कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून कोविड योद्ध्यांना केला अनोखा सलाम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:46 PM2020-08-16T13:46:59+5:302020-08-16T13:48:09+5:30
स्वातंत्र्यदिनी सोलापूरकरांचे वेधले लक्ष; १८ तासांची मेहनत ठरली यशस्वी...!
सोलापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्तसोलापूरच्या कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून अठरा तास मेहनत करून कोविड योद्ध्यांना सलाम करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला. रांगोळीच्या माध्यमातून कोविड योद्ध्यांना सलाम करण्याचा हा त्याचा उपक्रम स्वातंत्र्यदिनी सोलापूरकरांचे लक्ष वेधत होता.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूमुळे महामारीने धुमाकूळ घातला आहे. आपला भारत देशसुद्धा या महामारीचा बळी ठरला असून, खूप मोठे संकट उभे राहिले आहे आणि संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस खाते, प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, महसूल विभाग, जिल्हा परिषद कर्मचारी आणि सर्व विभागातील सफाई कामगार या सर्वांनी जीवाची पर्वा न करता, आपल्या कुटुंबीयांचा विचार न करता या कोरोना विषाणूच्या विरोधात सर्व लोकांचे जीव वाचविण्यासाठी तसेच जी काही मदत करणे शक्य आहे ती एका योद्ध्याप्रमाणे देऊन संकटाशी सामना केला.
या सर्व योद्ध्यांना स्फूर्ती येऊन पुन्हा अशा संकटकाळी उभे राहण्याची प्रेरणा मिळावी म्हणून सोलापूर येथील सिद्धार्थ नगरमध्ये राहणारे रांगोळी कलाकार सागर सुब्रमणी भारती यांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये रांगोळीच्या माध्यमातून चित्र काढून स्वातंत्र्य दिनानिमित्त सलाम केला आहे. ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना १८ तास लागले आहेत. या अगोदरसुद्धा सागर यांनी खूप मोठमोठ्या महापुरुषांची रांगोळीच्या माध्यमातून चित्रे काढली आहेत. २०१६ मध्ये त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे.