करमाळा येथे आॅडिशन देताना कलाकाराचा मृत्यू
By admin | Published: June 9, 2016 05:47 AM2016-06-09T05:47:40+5:302016-06-09T05:47:40+5:30
गाजर’ या मराठी चित्रपटात हिरो निवडण्यासाठी घेण्यात येत असलेल्या आॅडिशनवेळी एका तरूण कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
करमाळा (जि. सोलापूर) : ‘गाजर’ या मराठी चित्रपटात हिरो निवडण्यासाठी घेण्यात येत असलेल्या आॅडिशनवेळी एका तरूण कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना रविवार घडली.
करमाळा शहरातील एस. टी. कॉलनी वसाहतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चित्रपट निर्माते महादेव झोळ यांच्या ‘गाजर’ चित्रपटाचे आॅडिशन सुरू आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असलेला प्रफुल्ल भास्कर बोखारे (वय २६, रा. निमगावचोबे, ता. आष्टी, जि़ बीड) हा आई या विषयावर आॅडिशन देत होता. अत्यंत भावुक होत, ‘‘आई तू मला सोडून जाऊ नकोस.. आई...आई...’ असे म्हणत तो जमिनीवर लोटांगण घेत निपचित पडला. त्यानंतर आॅडिशनचा सीन कट होऊन कॅमेरामनसह सर्वांनीच त्याला हाक देऊन उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठलाच नाही. चित्रपट निर्माते महादेव झोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला उपजिल्हा रूग्णालयात त्याला दाखल केले. पण त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे. (वार्ताहर)