अरुणा ढेरे यांना स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 02:46 PM2019-07-22T14:46:10+5:302019-07-22T14:48:13+5:30
रविवारी वितरण; राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा परितोषिकाचे होणार वितरण
सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने देण्यात येणारा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार यंदाच्या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ़ अरुणा ढेरे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती मसापचे जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ़ सुहासिनी शहा यांनी दिली .
११ हजार रुपये रोख स्वर्गीय जनार्दन बिटला यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे चांदीचे कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे़ रविवार दि़ २८ जुलै रोजी सायंकाळी ५-३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यकारी विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांच्या हस्ते आणि म सा प पुण्याचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ़ अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.
या समारंभापूर्वी अरुणा ढेरे आणि स्व. दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश पायगुडे आणि मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी हे करणार आहेत. यावेळी हलसगीकर यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या ब्लॉगचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार यापूर्वी डॉ़ स्वर्णलता भिशीकर, डॉ़ अनिल अवचट, प्रा़ मिलिंद जोशी, अभिनेत्री स्पृहा जोशी, कवी संदीप खरे आणि क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना देण्यात आला होता.
या कार्यक्रमात यंदाच्या वर्षीच्या राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण होणार असून स्वर्गीय लक्ष्मीबाई माणिकराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुण्याच्या अक्षरधारा या दिवाळी अंकांला , तर स्वर्गीय श्रीनिवास कृष्णाजी जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिकच्या शब्दमल्हार या दिवाळी अंकाला, तर पिंपरी-चिंचवडच्या अक्षरवेध या दिवाळी अंकाला स्वर्गीय सुमतीबाई दत्तात्रय येळेगावकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच नाशिकच्या सुभाषित या दिवाळी अंकाला स्वर्गीय इंदिरा नारायण कुलकर्णी विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़