मोठी बातमी! तब्बल १० हजार वाहनधारकांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन; दहा महिन्यांत १० कोटींचा दंड
By Appasaheb.patil | Published: December 2, 2022 04:07 PM2022-12-02T16:07:17+5:302022-12-02T16:07:27+5:30
रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी शासनाकडून प्रवासी वाहनांना ‘ स्पीड लॉक ’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सोलापूर -
रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी शासनाकडून प्रवासी वाहनांना ‘ स्पीड लॉक ’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनेक वाहनांमध्ये हे बसविले गेले नाही. बसविलेल्या वाहनांमध्ये काही वाहनधारकांनी छेडछाड केली आहे. दरम्यान, स्पीड लॉक न बसविणे व छेडछाड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. ज्या वाहनांनी ‘ स्पीड लॉक ’ बसवले नाही अशा वाहनांनी त्वरित ‘ स्पीड लॉक ’ बसवून घ्यावे अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे असेही आरटीओ प्रशासनाने कळविले आहे.
दरम्यान, मागील दहा महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार वाहनधारकांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले असून त्यांना दहा कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
प्रवासी वाहनात ‘ स्पीड लॉक ’ आवश्यक
वेगात गाडी चालविल्याने अपघाताची शक्यता दाट असते. अनेक वाहनचालक वेगात वाहन चालवितात परिणामी अपघात होतो, त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवू नये. प्रवासी वाहनात ‘ स्पीड लॉक ’ लावणे आवश्यक आहे.
१० हजार वाहनांना २ कोटींचा ठोठावला दंड
भरधाव वेगात वाहने चालविल्याने सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हद्दीत दररोज अनेक अपघात होतात. मागील दहा महिन्यांत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेने ९ हजार ४७० वाहनांना वेग मर्यादेचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ कोटी ८८ लाख ५८ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पाेलिस निरीक्षक महेश स्वामी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
तर परवाना १२० दिवसांपर्यंत निलंबित होते...
विना परवाना चोरटी प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कलम ६६/१९२-अ अन्वये न्यायालयीन कारवाई होऊन रुपये ५ हजारापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन १२० दिवसांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. अशा प्रवासी वाहतुकीस विम्याचे संरक्षण नसते.