घरात अन् गोडाऊनमध्ये आढळला तब्बल नऊ लाखांचा गुटखा अन् तंबाखुजन्य साठा
By विलास जळकोटकर | Published: March 14, 2024 05:06 PM2024-03-14T17:06:25+5:302024-03-14T17:08:17+5:30
गुटखा माफियाला अटक; दोन दिवसाची पोलीस कोठडी.
विलास जळकोटकर, सोलापूर : राज्यभर गुटख्यासह तंबाकुजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असताना शहरातील भवानी पेठ, वैदूवाडी परिसरातील घरात व गोडावूनमध्ये तब्बल ९ लाख २८ हजार रुपयांचा साठा अन्न औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आला. या प्रकरणी हा साठा बाळगणाऱ्या महांतेश सिद्राम गुब्याडकर (वय- ३७ वर्षे) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी रेणुका रमेश पाटील आणि त्यांच्या पथकाने शेळगी रोडवरील भवानी पेठ येथील रहिवासी महांतेश गुब्याडकर याच्या राहत्या घरी आणि वैदुवाडी परिसरातील भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजता सुमारास छापे टाकले. या छाप्यात रजनीगंधा पानमसाला, राजू इलायची सुपारी, बाबा नवरतन पानमसाला, बाबा १२० तंबाखू, शुध्द प्लस पानमसाला, विना लेबल पानमसाला, आरएमडी पानमसाला, एम सुगंधीत तंबाखू असा प्रतिबंधित मालाचा साठा आढळून आला. त्याची सरकारी किंमत तब्बल ९,२८,७४५ रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या रेणुका पाटील यांच्या फिर्यादीनुसार महांतेश सिद्राम गुब्याडकर याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भादवि १८८,२७२,२७३,३२८, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलमान्वये गुन्हा नोंदला आहे. फौजदार अल्फाज शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
आर्थिक फायद्यासाठी केला साठा :
गुटखा माफिया महांतेश सिद्राम गुब्याडकर याने राज्यात गुटखा उत्पादन वाहतूक साठा आणि विक्रीवर अन्न सुरक्षा आयुक्त व औषध प्रशासन, मुंबई यांचे बंदीचे आदेश असताना, त्याचा भंग करून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी या प्रतिबंधित मालाचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले.
कोर्टाकडून पोलीस कोठडी :
मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा तंबाकुजन्य पदार्थाचा साठा करणाऱ्या महांतेश गुब्याडकर यास अटक केल्यानंतर गुन्हे शाखेचे फौजदार अल्फाज शेख यांनी त्याला गुरुवारी दुपारी येथील न्यायालयात प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.