एका महिन्यात तब्बल अडीच हजार वाहनांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन, ४४ लाखांचा दंड वसूल होणार, सोलापूर ग्रामीण पोलिस दलाची कारवाई
By Appasaheb.patil | Published: February 6, 2023 10:52 AM2023-02-06T10:52:58+5:302023-02-06T10:53:30+5:30
Traffic Police: महामार्गावरील वाढत्या अपघातामागे वाहनांचा अतिवेग हेही एक कारण असल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे.
- आप्पासाहेब पाटील
साेलापूर - महामार्गावरील वाढत्या अपघातामागे वाहनांचा अतिवेग हेही एक कारण असल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यातील ३१ दिवसांत २ हजार १७१ वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रस्ते अपघातास अनेक घटक कारणीभूत आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा असमतोलपणा, कुठे दुभाजकांमध्ये अधिक वाढलेली झाडे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सन २०२१ मध्ये रस्ते अपघातातील मृतांची संख्या ६१६ असून, २०२२ मध्ये ही संख्या ७०२ पर्यंत वाढली आहे. याचा परिणाम मृत व्यक्तीच्या कुटुंबावरही होतो. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करून वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा वेग मर्यादितच ठेवावा. लवकर निघा अन् सुरक्षित स्थळी लवकर पोहोचा, असे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने केले आहे.
एका महिन्यात ४३ लाखांचा दंड
जानेवारी महिन्यात पुणे, तुळजापूर, हैदराबाद, मंगळवेढा, अक्कलकोट, पंढरपूर व अन्य राष्ट्रीय महामार्गावर प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाहने चालविणाऱ्या २ हजार १७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहेत. या वाहनांना ४३ लाख ३९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
सोलापुरातून जाणारे सर्वच रस्ते चांगले झाल्याने वाहनधारक वेगात वाहने चालवीत आहेत. दररोज शेकडो गाड्या वेगमर्यादेचे पालन करीत नसल्याने स्पीड गनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांनी वेग पाळावा, अपघात टाळावा, वाहतूक नियमांचे पालन करावे.
- विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण