लाेकसभा निवडणूक हाेताच टाेलची दरवाढ जाहीर, साेलापूर-पुणे, साेलापूर-सांगली प्रवास महागला
By राकेश कदम | Published: June 2, 2024 12:48 PM2024-06-02T12:48:27+5:302024-06-02T12:48:41+5:30
साेलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार टाेल नाके आहेत. साेलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वरवडे आणि सावळेश्वर हे दाेन टाेल नाके आहेत.
लाेकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातले मतदान शनिवारी पार पडले. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील टाेलचे नवे दर जाहीर केले. साेलापूर-पुणे, साेलापूर-सांगली, साेलापूर-विजापूर, साेलापूर-अक्कलकाेट, साेलापूर-येडशी या मार्गावर कारचा, जीपचा प्रवास पाच रुपयांनी महागला आहे. गेल्या दहा वर्षांत टाेलचे दर तिप्पट झाल्याचे दिसून येत आहेत.
साेलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार टाेल नाके आहेत. साेलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वरवडे आणि सावळेश्वर हे दाेन टाेल नाके आहेत. या दाेन्ही टाेल नाक्यांवर कार आणि जीपच्या एका फेरीला ७० रुपये द्यावे लागायचे. ३ जूनपासून यासाठी ७५ रुपये द्यावे लागतील. मिनी बससाठी ११५ रुपये द्यावे लागायचे. आता १२० रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रक आणि बससाठी २४५ रुपये द्यावे लागायचे. आता २५० रुपये द्यावे लागणार आहेत. २४ तासाच्या आत परतीच्या प्रवासाचे दरही १० रुपयांनी महागले आहेत.
साेलापूर ते येडशी महामार्गावर साेलापूर हद्दीत तामलवाडी टाेल नाका आहे. या टाेल नाक्यावर कार आणि जीपसाठी पूर्वी ९५ रुपये द्यावे लागायचे. ३ जूनपासून १०५ रुपये द्यावे लागतील. मिनी बस, ट्रक यांच्या दरातही पाच रुपयांनी वाढ झाली. साेलापूर अक्कलकाेट, साेलापूर सांगली महामार्गावरील टाेल नाक्यांवरही प्रत्येक पाच रुपयांची वाढ झाली आहे.