राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम दिसताच गाड्या, मुद्देमाल सोडून दोघांनी काढला पळ
By Appasaheb.patil | Published: September 17, 2022 01:46 PM2022-09-17T13:46:00+5:302022-09-17T13:46:09+5:30
दोन मोटरसायकलीसह ५२० लिटर हातभट्टी दारू जप्त
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर शहरात हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन मोटरसायकलीसह ५२० लिटर हातभट्टी दारू असा एकूण १ लाख ३६ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख यांनी त्यांचे जवान चेतन व्हनगुंटी यांचेसह सोलापूर शहरात हैदराबाद रोड वर हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर पाळत ठेवली असता त्यांना एक इसम त्याच्या होंडा कंपनीचे एक्टिवा वाहनावरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना दिसून आला. सदर वाहनाचा पाठलाग केला असता आरोपी त्याची दुचाकी जागीच सोडून पळून गेला, या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने MH 12 HW 3900 या वाहनासह 70 लिटर क्षमतेच्या चार रबरी ट्यूब मध्ये 280 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 64,400 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक अ 2 विभाग मिसाळ यांनी जवान शोएब बेगमपुरे यांचेसह जुना विडी घरकुल परिसरातील मुळेगाव रोडवर एका सुझुकी कंपनीचे एक्सेस 125 मोटरसायकल वरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना सदर ठिकाणाहून दुचाकी वाहन क्रमांक MH13 DS 9209 मधून 60 लिटर क्षमतेच्या चार रबरी ट्यूब मधील 240 लिटर हातभट्टी दारु असा एकूण 72 हजार 400 रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी वाहन सोडून पळून गेल्याने त्यांना फरार घोषित करून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख, उषाकिरण मिसाळ, सुनिल पाटील व जवान कर्मचारी इस्माईल गोडीकट, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी व महिला जवान प्रियंका कुटे यांनी सहभाग नोंदविला आहे.